पुणे (Pune) : ‘स्टार एअर’ची हैदराबाद मार्गे पुणे ते बंगळूर (Pune To Bengaluru) अशी विमानसेवा बुधवारी सुरू झाली. पहिल्या दिवशी हैदराबादला ५२ प्रवाशांनी प्रवास केला.
येत्या काही दिवसांत पुण्याहून 'स्टार एअर' विमानांच्या उड्डाणांची संख्या वाढेल. दोन महिन्यांत 'उडान' योजनेत पुण्याहून इंदूर, जोधपूर, अजमेरसाठी विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती संजय घोडावत समूहाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
'स्टार एअर’च्या माध्यमातून देशांतर्गत विमान सेवा दिली जाते. नऊ विमानांच्या माध्यमातून १८ शहरांसाठी सेवा सुरू आहे. बुधवारी पुणे विमानतळावरून बंगळूर व्हाया हैदराबाद अशी विमानसेवा सुरू झाली. येत्या काही दिवसांत 'स्टार एअर'च्या विमानसेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. विशेषतः टू व थ्री टियरचा दर्जा असलेल्या शहरांना मेट्रो शहरांशी जोडण्यासाठी विमानसेवा सुरू केली जाणार असल्याचे घोडावत यांनी सांगितले.
'स्टार एअर'चे सध्या बंगळूर विमानतळ हा ‘बेस' आहे. मात्र येत्या तीन वर्षांत पुणे हे ‘बेस'चे ठिकाण बनविले जाईल. त्यासाठी विमानांच्या संख्येत देखील वाढ केली जाणार आहे. येत्या तीन वर्षांत किमान ३० विमाने सेवेत आणण्याचा प्रयत्न राहील असे कंपनीकडून सांगण्यात आले.