पुणे (Pune) : चांदणी चौकातील (Chandani Chaok) एक सेवा रस्ता आणि आठ रॅम्प वाहतुकीसाठी खुले करण्यात आल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वाहनधारकांना आता वळसा घालून जावे लागणार नाही. तसेच शनिवारी व रविवारी काही प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्नदेखील मिटला आहे. रॅम्प ३ व ७ चे २० टक्के काम अपूर्ण असून, ते देखील काही दिवसांतच पूर्ण केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.
चांदणी चौकात सुरू असलेले काम सुमारे ९० टक्के पूर्ण झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सेवा रस्त्यासह रॅम्प वाहतुकीसाठी खुला केला आहे. यात साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्याचा समावेश आहे. तर मुंबईहून कोथरूडच्या दिशेने येणाऱ्या सेवा रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून, येत्या काही दिवसांत तो देखील वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.
...अशी सुरू आहे वाहतूक
१. कोथरूडहून मुळशीकडे जाणारा अंडरपास सोमवारपासून सुरू झाला. हा ८५० मीटरचा रस्ता असून २६० मीटर भुयारी आहे.
२. बावधन-पाषाणमार्गे वारजे, कात्रजच्या दिशेने जाणारा रॅम्प क्रमांक ६ सुरू झाला आहे.
३. मुळशीमार्गे मुंबईला जाणारा रॅम्प क्रमांक २ सुरू झाला आहे.
४. मुळशीहून कोथरूड, साताऱ्याकडे जाणारा रॅम्प १ देखील सुरू
५. कोथरूडहून बावधनला जाणाऱ्या रॅम्प क्रमांक ७ चे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. येथूनही वाहतूक सुरू झाली आहे.
६. वेदभवनाकडून एनडीएकडे जाणारा रस्ता पूर्ण झाला आहे.
७. कोथरूड ते मुंबईकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावरून वाहतूक सुरू
चांदणी चौक रस्ते प्रकल्पातील सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. १ मेपर्यंत उर्वरित काम पूर्ण केले जाईल. रॅम्प व सेवा रस्त्यावरून वाहतूक सुरू झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटला आहे.
- संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे