पुणे (Pune) : मागील एक ते दोन महिन्यांपासून पुणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या (Traffic Problem In Pune City) निर्माण होत आहे. तसेच वाहतूक पोलिसांचा (Traffic Police) रस्त्यावरील अभाव आणि वाहतूक नियमन करण्याऐवजी दंडात्मक कारवाई करण्याकडे दिला जाणारा भर, यामुळे नागरिकांसह विविध विभागांकडून वाहतूक पोलिस टीकेचे धनी होत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने पोलिसांना काही ठिकाणी वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. मात्र खड्डे दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
पुणे शहरात वाहतूक कोंडी झाल्यानंतर पहिल्यांदा वाहतूक पोलिसांना लक्ष्य केले जाते. मात्र वाहतूक कोंडी ही केवळ पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच नव्हे, तर खराब रस्ते आणि त्यावरील खड्ड्यांमुळे (Potholes) होते. त्यामुळे शहरातील ७५ ठिकाणचे खराब रस्ते व खड्डे तातडीने दुरुस्त करावेत, अशा मागणीचे पत्र पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त गुप्ता यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे. त्यात शहराच्या वेगवेगळ्या भागांतील खराब रस्ते व मोठ्या प्रमाणात खड्डे असलेल्या ७५ ठिकाणांची नावे देण्यात आली आहेत. संबंधित रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत. रस्ते दुरुस्त झाल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यासह गंभीर स्वरूपाचे अपघातही कमी होतील, असे संबधित पत्रात नमूद केले आहे. कोरेगाव पार्क, लोणीकंद, लष्कर, वानवडी, कोंढवा, हडपसर, मुंढवा, लोणी काळभोर आदी विभागांतील रस्त्यांवर खड्डे आहेत, तर अनेक रस्ते खराब आहेत.
काही ठिकाणचे बहुतांश रस्ते खराब आहेत, तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणत खड्डे आहेत. खड्डे दुरुस्तीबाबत पोलिस आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला पत्र पाठविले आहे. त्यामध्ये ७५ ठिकाणचा समावेश आहे.
- अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा नियोजन