पुणे (Pune) : महापालिकेने मोठा गाजावाजा करून मशिनद्वारे (स्वीपर) रस्ते स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली. मात्र, त्यातून कचरा उचलण्यापेक्षा प्रचंड धूळ उडत आहे. असे असतानाही ठेकेदारांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शिवाय अत्याधुनिक गाड्या वापरून पादचारी मार्ग, दुभाजकाच्या बाजूने कचरा उचलण्यासाठी ७० कोटी रुपये खर्च केला. पण त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याने शहरातील प्रमुख १२ रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.
स्वच्छ भारत मोहिमेत अव्वल क्रमांक येण्यासाठी महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनात अनेक बदल केले. ते चांगले असले तरी त्याचा परिणामकारक वापर करता आला नाही. २०१७ पासून महापालिकेच्या पाचपैकी चार परिमंडळातील प्रमुख १२ रस्ते स्वीपरने स्वच्छ केले जातात. यंदापासून १५व्या वित्त आयोगातून १० कोटी रुपये खर्च करून कोंढवा-येवलेवाडी, ढोले पाटील रस्ता व कोथरूड परिसरात आणखी तीन स्वीपरचा वापर सुरु केला आहे. अशा प्रकारे १५ गाड्यांचा वापर सुरु आहे.
स्वीपरद्वारे अपेक्षीत काम
- स्वीपर मशिनमध्ये पाण्याची टाकी असते तर गाडीच्या खालच्या बाजूला गोल फिरणारे झाडू असतात.
- दुभाजक आणि पादचारी मार्ग या दोन बाजूने ही गाडी जाताना त्यावर पाणी मारून रस्त्यावर झाडू फिरविणे अपेक्षीत आहे. - त्यामुळे धूळ उडत नाही आणि झाडूने रस्ता स्वच्छ केला जातो. त्याचसोबत रस्त्यावरील पालापाचोळा, पाण्याच्या बाटल्या, खडी, वाळू, माती हा कचरा आतमध्ये ओढून घेतला जातो.
सद्यःस्थिती...
- शहरातील १२ रस्त्यांवर रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत स्वीपरद्वारे रस्ते स्वच्छ केली जातात.
- प्रथम दुभाजकाच्या बाजूने गाडी फिरवली जाते. त्यानंतर पादचारी मार्गाच्या बाजूने गाडी फिरते, असा दावा प्रशासनाने केला आहे.
- व्यवस्थित पाणी न मारता वेगामध्ये गाडी चालवली जात असल्याने मोठ्याप्रमाणात धुळ उडते, रस्त्यावरील पालापाचोळा, माती, खडी पूर्णपणे उचलली जात नाही.
- बराच कचरा दुभाजकाच्या व पादचारी मार्गाच्या बाजूला चिकटून राहातो. तो काढण्यासाठी प्रयत्न केला जात नाही. तसेच ठेकेदाराच्या या कामावर लक्ष ठेवण्यासाठी रात्री महापालिकेचा कोणताही कर्मचारी, अधिकारी उपस्थित नसतो.
पादचारी मार्ग अस्वच्छ
स्वीपरच्या कामाच्या निविदेत पादचारी मार्गावरील कचरा कामगारांनी झाडून तो रस्त्यावर आणणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक मार्गावर काही कर्मचारी व एक घंटागाडी दिली आहे. पादचारी मार्गावरून रस्त्यावर टाकलेला कचरा स्वीपरद्वारे व्यवस्थित उचलला जात नाही. तसेच कामगार घंटागाडीतून कचरा घेऊन जात नाहीत. त्यामुळे पादचारी मार्गाची बाजू अस्वच्छ राहते.
रोज ४० किमी रस्ते स्वच्छता
या निविदेत १२ रस्त्यांचा समावेश आहे. या प्रत्येक रस्त्याची लांबी १० किलोमीटर आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत स्वीपरकडून दुभाजकाच्या दोन्ही बाजूने व रस्त्याच्या दोन्ही बाजूचे पादचारी मार्ग असे चार वेळा म्हणजे एक स्वीपरकडून ४० किलोमीटरचे रस्ते स्वच्छ केले जातात. तरीही रस्त्यावर माती, खडी, पालापाचोळा पडून असतो.
स्वीपरने रस्त्यांची स्वच्छता व्यवस्थित केली जात नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने तीन ठेकेदारांना सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी ६० हजार रूपयांचा दंड केला आहे. स्वीपरने काम करताना धुळ उडू नये, संपूर्ण कचरा उचलला गेला पाहिजे अशा सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. यात सुधारणा न झाल्यास पुन्हा कडक कारवाई करू.
- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग
मी दररोज रात्रीच्यावेळी सातारा रस्त्यावरून जातो. त्यावेळी स्वीपरने स्वच्छता केली जाते. रस्ते स्वच्छ होत असले तरी थोड्याफार प्रमाणात धूळ उडते.
- सागर देशमुख, कात्रज