पुणे (Pune) : तुम्ही मुंबई-पुणे महामार्गावर निगडी ते दापोडी किंवा दापोडी ते निगडी मार्गिकेतून वाहन चालवत असाल; तर त्याचा वेग प्रतितास ३० किलोमीटर इतका मर्यादित ठेवावा लागेल. अन्यथा स्पीड गनद्वारे तुमच्या वाहनाचा क्रमांक पोलिसांपर्यंत पोहोचेल.
‘डेंजर’ वेगाने तुम्ही वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आल्यास दंड भरावा लागेल. कारण, पिंपरी चिंचवड महापालिका (PCMC) व पोलिसांनी महामार्गावर स्पीडगन व वेगमर्यादा दर्शक फलक लावले आहेत. केवळ महामार्गावरच नव्हे; तर शहरातील अन्य चार रस्त्यांवरही हे फलक आहेत. त्यावरील वाहनांचा प्रतितास वेग निश्चित करण्यात आला आहे.
शहराच्या मध्यातून मुंबई-पुणे महामार्ग गेला आहे. निगडी ते दापोडी दरम्यान आकुर्डी खंडोबा माळ, चिंचवड स्टेशन येथील अहिंसा चौक व महावीर चौक आणि पिंपरीतील मोरवाडी चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशा तीन ठिकाणी ग्रेड सेपरेटर आहेत.
महामार्गाच्या दोन्ही बाजूने सेवा रस्ता आहे. त्यामुळे नाशिक फाटा व फुगेवाडी चौक वगळता निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते दापोडीतील हॅरिस पुलापर्यंत विनाअडथळा जाता येते. सेवा रस्त्यावरून मुख्य मार्गावर येण्यासाठी व मुख्य मार्गावरून सेवा रस्त्यावर जाण्यासाठी ‘इन’ व ‘आऊट’ पंचिंग ठेवले आहेत. सुमारे बारा किलोमीटरचे हे अंतर अवघ्या काही मिनिटांवर आले आहे. त्यामुळे वाहनांचा वेग वाढला असून, अपघातास निमंत्रण ठरत आहे. त्यांना आळा घालण्यासाठी वेगमर्यादा निश्चित केली आहे.
शहरातील मोठे रस्ते
मुंबई-पुणे महामार्गासह पुणे-नाशिक महामार्ग, मुंबई-बंगळूर (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग), औंध-रावेत-किवळे बीआरटी मार्ग, निगडी-भोसरी टेल्को रस्ता, आळंदी-दिघी पालखी मार्ग, निगडी-भोसरी-मोशी प्राधिकरण स्पाइन रस्ता, देहू-आळंदी रस्ता, काळेवाडी फाटा ते चिखली बीआरटी आणि नाशिक फाटा ते वाकड बीआरटी हे रस्ते प्रशस्त आहेत. त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा वेग अधिक असतो.
असा असतो ‘अलर्ट’
महामार्गासह अन्य मोठ्या रस्त्यांवरून वाहन जाताना स्पीडगनद्वारे त्याचा प्रतितास प्रतिकिलोमीटर वेग मोजला जातो. निश्चित वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगात वाहन असल्यास शेजारील वेगमर्यादा फलकावर वाहनांचा वेग व ‘डेंजर’ असे शब्द लाल रंगाच्या अक्षरात उमटतात. फलकावरच वाहनांचा वेग दिसत असल्यामुळे काही वाहन चालक निश्चित मर्यादेपेक्षा कमी वेगाने वाहन चालवतात. मात्र, फलक व स्पीड गन नसलेल्या ठिकाणी वाहनचालक निश्चित वेगापेक्षा अधिक वेगाने वाहने चालवतात.
या रस्त्यांवर फलक
मुंबई-पुणे महामार्गावर अर्थात निगडी ते दापोडी दरम्यान ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादा निश्चित केली आहे. आळंदी ते दिघी रस्त्यावर ताशी ४० आणि स्पाइन रस्त्यावर ताशी ५० किलोमीटर वेगमर्यादा निश्चित केली आहे. पुणे-नाशिक महामार्ग, वाकड-हिंजवडी रस्ता, निगडी-भोसरी टेल्को रस्त्यावरही वेग मर्यादा निश्चित केली जाणार आहे. त्याबाबतचे फलक लावलेले असून काही कार्यान्वित झाले असून काही कार्यान्वित व्हायचे आहेत.
वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी व वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर ‘स्पीड लिमिट’ निश्चित केले आहे. स्ट्रक्चरल इंजिनियरच्या सूचनांनुसार, प्रत्येक रस्त्याची वेगमर्यादा वेगवेगळी आहे. सध्या दोन ठिकाणी ‘स्पीड गन’ बसविल्या आहेत. आणखी चार ठिकाणी स्पीड गन बसविण्यात येणार आहेत. वाहनचालकांनीही ‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’ हे लक्षात ठेवून वाहनांचा वेग मर्यादित ठेवायला हवा.
- बापू बांगर, पोलिय उपायुक्त, वाहतूक शाखा