पुणे (Pune) : पुणे शहरातील (Pune City) बालगंधर्व आणि ‘यशवंतराव चव्हाण' या दोन प्रमुख नाट्यगृहांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे प्रगतिपथावर आहेत. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात वातानुकूलन यंत्रणेचे दोन संच नव्याने बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय नाट्यगृहाच्या आवारात वाहनतळ, आरक्षण कार्यालय आणि कलादालनाचे काम सुरू आहे. बालगंधर्वमधील सुधारणांच्या कामांनाही वेग आला आहे.
नाट्यगृहांच्या दुरवस्थेबद्दल सतत तक्रारी आल्यानंतर प्रशासनाला अखेर गेल्या महिन्यात जाग आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याची दखल घेतली. नाट्यगृहांसाठी निधी देण्याचे व सगळी कामे तातडीने पूर्ण करण्याचा आदेश त्यांनी प्रशासनाला दिला. त्यानंतर सुधारणांना वेग आला. वातानुकूलन यंत्रणेच्या (एसी प्लांट) दुरुस्तीसाठी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह सहा जुलैपासून सुमारे ४० दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाला. हे संच बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
बालगंधर्वमधील समस्यांचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. अस्वच्छता, डासांचा प्रादुर्भाव, उंदरांचा सुळसुळाट अशा अनेक समस्यांनी या ऐतिहासिक नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे. त्यातच अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने टँकरने पाणी मागविण्याची वेळ आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आल्याने पाण्याचा प्रश्न सुटला. याचा फायदा स्वच्छता राखण्यासाठी होत आहे.
बालगंधर्वमध्ये कामांची स्थिती
- डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सकाळी फवारणी
- नाट्यगृह व परिसराची नियमित स्वच्छता
- मेकअप रुममध्ये पडदे, दिव्यांची सोय
- उंदरांचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न
- सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीसाठी अर्ज
वातानुकूलन यंत्रणा, सांडपाणी निचरा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तळघरात पाणी साचू नये म्हणूनही काम सुरू आहे. या सर्व कामांसाठी वेळ लागेल. त्यासाठी महापालिकेचे सर्व विभाग आम्हाला सहकार्य करीत आहेत. त्यामुळे उर्वरित कामेही लवकरच पूर्ण होतील.
- सुप्रिया हेंद्रे, व्यवस्थापक, बालगंधर्व रंगमंदिर
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील कामे चांगल्या गतीने सुरू आहेत. ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धातील नाटकांसाठी नाट्यगृह आरक्षितही झाले आहे. त्यामुळे हे काम वेळेवर पूर्ण व्हावे अशी आमची अपेक्षा आहे.
- सत्यजित धांडेकर, नाट्य व्यवस्थापक, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह