पुणे (Pune) : मुळशीतील नागरिकांना पिण्यासाठी एक टीएमसी (1 TMC) पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी टाटा पॉवर (Tata Power) कंपनीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर नऊ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
मुळशीतील सामाजिक कार्यकर्ते अमित कंधारे यांनी ॲड. कृष्णा मोरे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुळशीतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता टाटा पॉवर कंपनीने किमान एक टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे. या पाण्यामुळे सुमारे ५० गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल, असे याचिकेत नमूद आहे.
१९१५-२७ दरम्यान मावळ-मुळशी तालुक्यात मुळशी, लोणावळा, वळवण, शिरोटा, कुंडली आणि ठोकरवाडी अशी सहा धरणे बांधण्यात आली आहेत. सध्या ही धरणे टाटा पॉवर कंपनीच्या ताब्यात असून, तेथे वीजनिर्मिती केली जाते. शतकापूर्वी टाटा पॉवर कंपनीने भिरा, भिवपुरी आणि खोपोली येथे जलविद्युत निर्मिती प्रकल्प उभे केले.
यासाठी टाटा कंपनीने पश्चिम बाजूचे पाणी हे भिरा, भिवपुरी आणि खोपोली या जलविद्युत केंद्रांकडे वळविले.
दरम्यान, मुळशी धरणातील पाणी हे मुळशीतील २४ गावे, हिंजवडीतील १३ गावे आणि कोळवणमधील ११ गावांसाठी राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र स्टेट वॉटर पॉलिसी, २०१९ अनुसार पिण्याच्या पाण्याला राज्य सरकारने वीजनिर्मिती व उद्योगांना लागणाऱ्या पाण्यापेक्षा अधिक महत्त्व दिले आहे. वाढत्या लोकसंख्येला अनुसरून टाटाने एक टीएमसी पाणी नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
- ॲड. कृष्णा मोरे, याचिकाकर्त्यांचे वकील