पुणे (Pune) : पुणे महापालिकेने (PMC) G-20 परिषदेसाठी लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्त्याची रंगरंगोटी, स्वच्छता सुरू केलेली असताना या रस्त्यावर ३० पेक्षा जास्त ट्रक राडारोडा उचलण्याची नामुष्की आली. महापालिका दरवर्षी रस्त्यातील राडारोडा उचलणे, रस्ते स्वच्छ करणे, दुरुस्त करणे या कामांचे टेंडर (Tender) काढते. पण ‘जी २०’च्या निमित्ताने एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा निघाल्याने यापूर्वी केलेल्या कामांची पोलखोल झाली आहे.
पुण्यात जी २०ची बैठक होत आहे. परिषदेसाठी उपस्थित राहणारे देश-विदेशांतील प्रतिनिधी शनिवारपासून पुण्यात येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे मागील दोन दिवस उर्वरित कामे वेगात करण्याची महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू होती. हे उच्चपदस्थ अधिकारी लोहगाव विमानतळावरून सेनापती बापट रस्त्यावर येणार असल्याने या सुमारे १० किलोमीटरच्या रस्त्यावर गेल्या महिन्याभरापासून रंगरंगोटी, सुशोभीकरण करण्यात आले आहे.
पण समन्वयाचा अभाव व काम अपूर्ण ठेवणे यामुळे महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर कामाला वेग आला. ही कामे करताना या १० किलोमीटरच्या अंतरात रस्ता, पादचारी मार्गावर तब्बल ३० पेक्षा जास्त ट्रक राडारोडा, माती, दगड गोळा झाले आहेत. पथ विभागाने घनकचरा विभागाच्या ठेकेदारांकडून ही कामे करून घेऊन रस्ता चकाचक केला.
रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत १२३ जणांवर कारवाई करून १ लाख २३ हजाराचा दंड वसूल केला आहे. तसेच जे नागरिक पैसे देण्यास तयार नव्हते त्यांच्याकडून रस्ता पुसून घेण्यात आला. ही कारवाई अधिक कडक केली जाणार असल्याचे घनकचरा विभागाने सांगितले.