पुणे (Pune) : किवळे, मामुर्डी, गहुंजे आणि सांगवडे, साळुंब्रे ही पवना नदीच्या अल्याड-पल्याडची गावे. एका काठावरून दिलेल्या हाकेला पलीकडून साद मिळते आणि पलीकडच्या हाकेला अलीकडून साद मिळते, अशी या गावांची अवस्था. पण, पावसाळ्यात पाण्याखाली जाणारे धोकादायक साकव, बारा महिने दुथडी भरून वाहणारी नदी आणि ती पार करण्यासाठी पक्का नसलेला पूल, यामुळे साधारण दहा ते पंधरा किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. त्यातून आता या गावांसह पवन मावळातील अन्य गावांतील नागरिकांचीही सुटका होणार आहे.
कारण, गहुंजे व साळुंब्रे यांना जोडण्यासाठी पवना नदीवर पूल उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. या पुलामुळे पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीसह देहू व देहूरोडचा पवन मावळातील गावांशी बाराही महिने थेट संपर्क राहणार आहे, त्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मामुर्डी-किवळे गावापर्यंत आहे. तेथून पुढे मुंबई-बंगळूर महामार्ग (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) सुरू होतो. या दोन्ही मार्गामुळे किवळे, मामुर्डी व गहुंजे या गावांचे शिवार विभागले गेले आहे. गावांच्या एका बाजूला पवना नदी आहे. तिचे पात्र खोल आणि रुंद आहे. तिच्या एका तीरावर किवळे, मामुर्डी, गहुंजे आणि दुसऱ्या तीरावर साळुंब्रे, सांगवडे आहे.
दोन्ही गावांची शेती नदी काठापर्यंत आहे. पण, ती ओलांडण्यासाठी पक्का पूल नाही. त्यामुळे सोमाटणे फाटा मार्गे किंवा ताथवडे, पुनावळेतून जांभे मार्गे जावे लागते. हा साधारण दहा ते पंधरा किलोमीटरचा वळसा असून हाकेच्या अंतरावरील गावे दुरावली आहेत. त्यांना जोडण्यासाठी पुलाची आवश्यकता आहे. आता तो दृष्टिक्षेपात असून गहुंजे व साळुंब्रे या गावांना जोडले जाणार आहे.
पुलाची गरज का?
गेल्या दहा-पंधरा वर्षांत पवनमावळात काही कंपन्या सुरू झाल्या. गावांचा विकास होऊ लागला. शेतकऱ्यांकडेही स्वयंचलित वाहने आली आहेत. त्यामुळे पवन मावळात वाहनांची ये-जा वाढली असून पक्के रस्ते व पूल कमी आहेत. काही किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. त्यामुळे वेळ व इंधनावरील खर्च वाढत आहे. त्यातून सुटका होण्यासाठी व या गावांच्या आणखी विकासासाठी पवना नदीवर पुलांची गरज आहे. त्यातील काही अंशी गरज गहुंजे-साळुंब्रे पुलामुळे पूर्ण होत आहे.
अशी आहे वस्तुस्थिती
- साळुंब्रे-गहुंजे ः या गावांना जोडण्यासाठी नदीमध्ये सिमेंटचे पाइप, त्यावर माती व मुरूम टाकून तात्पुरता रस्ता केला आहे. पावसाळ्यात तो पुराच्या पाण्याखाली जातो. त्याची माती-मुरूम व पाइप वाहून जातात. त्यामुळे दोन्ही गावांतील नागरिकांची गैरसोय होते. आता दुपदरी पूल बांधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सुमारे १४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शिवाय, पुलासोबतच कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्याचेही नियोजन आहे. दळणवळणासाठी पूल सोईचा ठरणार आहे.
- सांगवडे-मामुर्डी ः या गावांना जोडण्यासाठी मामुर्डी स्मशानभूमीजवळ जिल्हा परिषदेने पंधरा वर्षांपूर्वी लोखंडी साकव बांधला आहे. त्यावरून दुचाकींसह चारचाकी मोटारीही जातात. तो धोकादायक असून काही ठिकाणी लोखंडी कठडे तुटलेले आहेत. एका वेळी एक चारचाकी जाईल इतकाच तो अरुंद आहे. जड वाहनांसाठी तो बंद केला आहे. तसा सूचना फलकही लावलेला आहे. तरी देखील नागरिक धोकादायकरीत्या वाहतूक केली जात आहे.
दृष्टिक्षेप
- गहुंजे-साळुंब्रे पुलाचे काम मे अखेर पूर्ण होण्याची अपेक्षा
- पुलामुळे पूर्व पवनमावळाचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा सुटेल
- पवन मावळातील गावे देहूरोड, पिंपरी-चिंचवडला जोडली जातील
- साळुंब्रे पुलाच्या कामाचे ८ फेब्रुवारी २०२२ रोजी भूमीपूजन
- पुलाचे काम मे २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन