पुणे (Pune) : राज्य सरकारने मुद्रांक शुल्क अभय योजना लागू केल्यामुळे मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होत आहेत. या अर्जांच्या पूर्ततेसाठी हवी असणारी कागदपत्रे नागरिकांना जलद मिळावीत, यासाठी हवेली क्रमांक १ आणि २ या निबंधक कार्यालयात १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत नवीन दस्तनोंदणी होणार नाही, असे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात येत आहे.
नागरिकांना अर्जाच्या नकाला देणे तसेच अभय योजनेचे काम या दोन कार्यालयांत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी हवेली क्र. २१, २२ आणि २३ या कार्यालयांच्या साप्ताहिक सुट्या रद्द करून त्या दिवशी या तीन कार्यालयांत दस्त नोंदणी सुरू ठेवण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना जिल्हा सहनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे म्हणाले, ‘‘हवेली क्रमांक २१, २२ आणि २३ हे तीन कार्यालये शनिवारी-रविवारी देखील सुरू असतात. या कार्यालयांना सोमवारी, मंगळवारी साप्ताहिक सुटी देण्यात येते. यात बदल करून या तीन कार्यालयांची साप्ताहिक सुटी रद्द करून सोमवारी आणि मंगळवारी ही कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’’