पुणे (Pune) : दसऱ्याच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवडकरांना केंद्र सरकारकडून गोड बातमी मिळाली आहे. स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गाचे ‘सीमोल्लांगन’ होऊन पिंपरीपासून निगडीपर्यंत विस्तार होणार आहे. त्यासाठीच्या खर्चाचे गणित मांडत केंद्र, राज्य व महापालिकेचा वाटा किती आणि कर्ज अथवा निधी किती उभारावा लागेल, याचाही अंदाज दिला आहे. यामुळे मेट्रो मार्ग विस्ताराची शहरातील नागरिकांची मागणी पूर्ण झाली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पुणे मेट्रोचे दोन मार्ग मंजूर आहेत. त्यातील स्वारगेट ते पिंपरी या मार्गाचा मुळा नदीवरील दापोडीतील हॅरिस ब्रिजपासून पिंपरी-चिंचवड महापालिका (पीसीएमसी) भवनापर्यंत समावेश होतो. हाच मार्ग पुढे निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढवावा, अशी नागरिकांची मागणी होती. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित होता. त्याला अर्थात पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो विस्तारीकरणाच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने सोमवारी (ता. २३) मान्यता दिली.
केंद्रीय उपसचिवांचे पत्र
पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी मार्गाचे निगडीपर्यंत विस्तारीकरणाच्या मान्यतेबाबतचे केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाचे उपसचिव सुनील कुमार यांनी राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. त्यात पिंपरी ते निगडी या ४.४१३ किलोमीटर अंतर विस्ताराला मान्यता दिल्याचे म्हटले आहे.
शहरातील मेट्रोचे टप्पे
पहिला टप्पा ः फुगेवाडी ते पिंपरी या मार्गावर सहा मार्च २०२२ रोजी प्रवासी वाहतूक सुरू झाली. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातून ऑनलाइन पद्धतीने झाले होते.
दुसरा टप्पा ः फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट स्थानक पुणे या मार्गाचे लोकार्पणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक ऑगस्ट २०२३ रोजी झाले. त्यामुळे पिंपरी ते पुणे सिव्हिल कोर्ट तेथून कोथरूड वनाज आणि पुणे स्टेशन, रूबी हॉलपर्यंत जाणे सोयीचे झाले.
तिसरा टप्पा ः पिंपरी (पीसीएमसी) ते निगडी मार्गाला २३ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने मान्यता दिली. पिंपरी स्थानकाजवळील एम्पायर इस्टेट पुलापर्यंत मार्गाचे काम झाले आहे. सध्या तिथे मेट्रो यार्ड आहे. तेथून पुढे मार्ग विस्तारीकरणाचे नियोजन आहे.
शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था सक्षम करणे गरजेचे आहे. स्वारगेट ते निगडीपर्यंत मेट्रो हा पिंपरी-चिंचवड व पुणे शहराचा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी सकारात्मक भूमिका मांडली होती.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी
मेट्रोची वैशिष्ट्ये
- निगडीपर्यंत विस्तारीकरणामुळे निगडी, आकुर्डी, चिंचवड स्टेशन परिसरातील नागरिकांची सोय होणार
- चिंचवड स्टेशन, आकुर्डी खंडोबा माळ, निगडी टिळक चौक हे तीन थांबे प्रस्तावित आहेत.
- दापोडी ते पिंपरी अंतर ७.९ किलोमीटर असून, त्यात ४.१३ किलोमीटर मार्गाची भर पडणार आहे
- पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूचे भाग मेट्रोशी जोडले जातील, विशेषतः प्राधिकरण जोडले जाईल
- मेट्रो मार्गाची शहरातील एकूण लांबी १२.०३ किलोमीटर होईल, तो पूर्णतः उन्नत (एलिव्हिटेड) मार्ग असेल.
- महाराष्ट्र रेल कार्पोरेशन लिमिटेडने (महामेट्रो) विस्तारित मार्गासाठी ९१० कोटी १८ लाख रुपयांचा अंदाज वर्तवला आहे
- विशेष उद्देश वहन (महामेट्रो) कार्यप्रणालीतून प्रकल्प साकारला जाणार आहे. त्यात केंद्र व राज्य सरकारचा निम्मा-निम्मा सहभाग असेल
असे असतील स्थानके
- चिंचवड स्टेशन (महावीर व अहिंसा चौक दरम्यान)
- आकुर्डीतील खंडोबा माळ चौक
- निगडी (टिळक चौक व भक्ती-शक्ती चौक दरम्यान)
सध्याची स्थानके
- पीसीएमसी (पिंपरी-चिंचवड महापालिका भवन)
- संत तुकारामनगर (वल्लभनगर)
- भोसरी (नाशिक फाटा)
- कासारवाडी
- फुगेवाडी
- दापोडी
असा होईल खर्च
सहभाग / टक्केवारी / रक्कम (कोटी रुपयांत)
केंद्र सरकार / १० / ६७.०२
राज्य सरकार / ११.८ / ७९.०८
महापालिका / १८.२ / १२१.९७
कर्ज किंवा निधी / ६० / ४०२.११
एकूण / १०० / ६७०.१८
अपेक्षित खर्चाचे वर्गीकरण
- महापालिका, केंद्र व राज्य सरकार आणि अन्य निधीतून ६७० कोटी १८ लाख रुपये
- विविध कराची रक्कम ९० कोटी ६३ लाख रुपये
- महापालिका जागा व अन्य वाटा १३७ कोटी ८८ लाख रुपये
- पीपीपी (खासगी भागीदार) तत्त्वानुसार ११ कोटी ५० लाख रुपये
- एकूण खर्च अंदाजे ९१० कोटी १८ लाख रुपये