पुणे (Pune) : मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर रविवारी रेल्वे पकडण्यासाठी प्रवाशांची चेंगराचेंगरी झाली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने पुण्यासह सात रेल्वे स्थानकांवर ८ नोव्हेंबरपर्यंत प्रवाशांव्यतिरिक्त फलाटावर येणाऱ्यांना मज्जाव केला आहे. रेल्वे प्रशासनाने फलाट तिकीट विक्रीवर बंदी घातली आहे.
पुणे स्थानकावरून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे दीड लाख इतकी आहे. तर सुमारे ५ ते १० हजार व्यक्ती प्रवाशांना सोडण्यासाठी पुणे स्थानकावर दाखल होत असतात. त्यामुळे फलाटावर गर्दी वाढत जाते.
दिवाळीच्या काळात तर गर्दीचा उच्चांक असतो. गर्दी वाढल्याने कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने फलाट तिकिटावर बंदी घातली आहे. मात्र प्रवासी जर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग अथवा ज्यांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता असेल अशा प्रवाशांसोबत फलाटावर येण्यासाठी मुभा दिली आहे. केवळ अशा व्यक्तींनाच फलाटाचे तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी रविवारपासून करण्यात आली.
या स्थानकांवर नो एंट्री
पुणे, सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनल्स, ठाणे, कल्याण, नागपूर
सण, उत्सवांच्या काळात पुणे रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी लक्षात घेता फलाट तिकिटाच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहे. हा निर्णय काही काळापुरता घेण्यात आला आहे.
- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे