पुणे (Pune) : मुंबई बंगळूर महामार्गावरील पाषाण सुतारवाडीजवळ असलेल्या विनापरवाना शोरूम, फर्निचर मॉल इत्यादीवर बांधकाम विकास विभागाच्यावतीने आज अतिक्रमण कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे तीन लाख चौरस फुटांचे बांधकाम पाडण्यात आले. यापूर्वीही या ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. परंतु काही दुकानदारांनी उच्च न्यायालयात दावा दाखल करून स्थगिती आदेश मिळवले होते. मात्र २३ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने स्थगिती आदेश उठवले. यानंतर स्थानिक बंदोबस्त मिळवून आज ही कारवाई करण्यात आली.
स्थगिती आदेशानंतर सहा दुकानदार सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यामध्ये आज स्थगिती आदेश मिळण्याची शक्यता असल्याने सकाळी लवकर कारवाई सुरू करण्यात आली. सहापैकी पाच दुकानदारांवर या पूर्वी कारवाई करण्यात आली होती.
ज्या दुकानदारावर कारवाई झाली नव्हती त्यांच्यावर प्रथम कारवाई करण्यात आली. तर सहा दुकानदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिले. परंतु तत्पूर्वीच कारवाई पुर्ण झालेली होती. संबंधित बांधकाम हे उच्च उर्जा धातू संशोधन प्रयोगशाळा (एचईएमआरएल) या संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत आहे. याठिकाणी असलेल्या दुकानांमुळे महामार्गावर वाहतुकीस अडथळा येत होता. याबाबत एचईएमआरएलकडूनही तक्रारी करण्यात आल्या होत्या.
पुढील आठवड्यात समोरील बाजूच्या दुकानांवर कारवाई करण्यात येणार असून कीर्ती गार्डन येथील फार्म हाऊसवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे उपअभियंता सुनील कदम यांनी सांगितले.
यावेळी जॉ कटर मशीन, दोन जेसीबी, गॅस कटर, ब्रेकरचा वापर केला गेला. तसेच हिंजवडी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलिस कर्मचारी, पंधरा बिगारी यांचा या कारवाईत सहभाग होता. ही कारवाई अधीक्षक अभियंता राजेश बनकर, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता सुनिल कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे शाखा, समीर गडई यांनी पूर्ण केली.