पुणे (Pune) : वारज्यातील खड्ड्यात पाणी जमा झालेले असताना त्यात काँक्रिट टाकून खड्डा बुजविण्याचा उद्योग ठेकेदाराला (Contractor) चांगलाच भोवला आहे.
संबंधित समान पाणीपुरवठ्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला महापालिकेने १ लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, चुकीच्या पद्धतीने केलेला रस्ता उखडून टाकून तेथे नव्याने रस्ता करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरात समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. जलवाहिनी टाकल्यानंतर ठेकेदाराकडून काँक्रिट टाकून खड्डे बुजविले जात आहेत. वारजे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जलवाहिनी टाकल्यानंतर त्या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा झाले. हे पाणी बाहेर न काढता पाण्यात थेट काँक्रिट टाकले जात होते. त्यामुळे सिमेंटमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी समाजमाध्यमांवर पुणे महापालिका आणि ठेकेदारावर टीकेची झोड उठवली. आमच्या कर रूपी पैशांचे वाटोळे केले जात आहे, महापालिकेत असाच भ्रष्टाचार होत आहे, अशी टीका केली.
दरम्यान, या वृत्ताची दखल घेत महापालिकेने निकृष्ट पद्धतीने केलेला रस्ता उखडून टाकण्यास ठेकेदाराला सांगून तेथे नियमानुसार काँक्रिटीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच चुकीच्या कामामुळे महापालिकेची बदनामी झाल्याने एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
समान पाणीपुरवठ्याचे काम खासगी कंपनीकडून सुरू आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कंपनीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सल्लागारासही नोटीस बजावण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम पुन्हा करण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत.
- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा, पुणे महापालिका