पुणे (Pune) : पुणे-औरंगाबाद ग्रीन कॉरिडॉअर (Pune - Aurangabad Green Corridor) हा सध्या असलेल्या महामार्गाव्यतिरिक्त स्वतंत्र महामार्ग (Highway) असणार आहे. पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर, हवेली आणि दौंड तालुक्यातील ३९ गावांतून जाणार आहे. नव्याने विकसित होणारा हा महामार्ग पुणे, अहमदनगर, औरंगाबाद आणि बीड (Pune, Ahmednagar, Aurangabad & Beed) या चार जिल्ह्यांतील १२२ गावांतून जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे-औरंगाबाद आणि पुणे-बंगळूर ग्रीन कॉरिडॉरचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी सर्वंकष प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. सल्लागार कंपनीकडून पुणे-औरंगाबाद ग्रीन कॉरिडॉर मार्गाची प्रारूप आखणी निश्चित करण्यात आली आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे.
पुणे-औरंगाबाद ग्रीन पुणे-औरंगाबाद ग्रीन कॉरिडॉर हा पूर्णत: वेगळा असणार आहे. सध्या असलेल्या पुणे-औरंगाबाद महामार्गापेक्षा याचे आखणी वेगळी असणार आहे. २४७.९ किलोमीटर लांबीचा हा ग्रीन कॉरिडॉर चार जिल्ह्यांतील १२ तालुक्यांतील १२२ गावांतून जाणार आहे. त्यासाठी सुमारे २ हजार ८५५ हेक्टर जमिनींचे संपादन करावे लागणार आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, पुरंदर, भोर आणि दौड तालुक्यातील ३९ गावांतून तो जाणार आहे. त्यासाठी या चार तालुक्यांतील ८०० हेक्टर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. हा ग्रीन कॉरिडॉर सहा पदरी असणार आहे.
असा जाणार ग्रीन कॉरिडोअर
- पुरंदर, दौंड आणि हवेली तालुक्यांतील प्रत्येकी आठ गावे
- भोरमधील पाच, तर शिरूर तालुक्यातील सहा गावे
- बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील २ गावे
- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील ३, पारनेर १० मधील १६, पाथर्डी १५, शेवगाव १६ आणि पैठणमधील २५ गावांतून जाणार
पुणे-औरंगाबाद ग्रीन कॉरिडॉरचा डीपीआर तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून अंतिम प्रस्ताव आल्यानंतर भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.
- राजेंद्र मुठे, उपायुक्त, भूसंपादन महसूल विभाग