पुणे (Pune) : Pune Metro मेट्रोच्या विस्तारीकरणामुळे प्रवाशांची संख्या वाढणार आहे. मेट्रो स्टेशनपर्यंत नागरिकांना येता यावे यासाठी ई-रिक्षाचा वापर चांगल्या पद्धतीने करून घेता येईल. रिक्षा स्टॅंडजवळ चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासंदर्भात महापालिकेने नियोजन करावे, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली.
पुणे महापालिकेतर्फे (PMC) राष्ट्रीय शुद्ध हवा उपक्रमाअंतर्गत ई-रिक्षासाठी अनुदान वाटप आणि मिस्ट बेस्ड फाउंटन सिस्टिमचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नितीन शिंदे, ‘एआरएआय’चे जितेंद्र पुरोहित, पर्यावरण विभागाचे उपायुक्त माधव जगताप, रिक्षा पंचायतीचे प्रतिनिधी नितीन पवार आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ई-रिक्षा घेण्यासाठी केंद्र शासन आणि महापालिकेतर्फे एकत्रित एक लाख रुपये अनुदान मिळत आहे. ई-रिक्षामुळे इंधनाच्या खर्चात बचत होऊन, त्यांच्या कुटुंबासाठी जास्त उत्पन्न मिळू शकेल. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि उत्पन्न वाढविण्यासाठी रिक्षा चालकांनी ई-रिक्षा वापरण्याकडे वळावे. रिक्षा थांब्याजवळ चार्जिंग स्टेशन उभारण्याबाबत महापालिकेने नियोजन करावे.
मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यानंतर शहरात प्रवाशांची संख्या चार लाखांवर पोचेल. प्रवाशांना घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंत पोचण्यासाठी ई-रिक्षा, सीएनजी रिक्षाचा वापर होणे गरजेचे आहे. शहरातील चौकात बसविलेल्या मिस्ट बेस्ड फाउंटनमुळे हवेतील धूलिकण कमी होऊन प्रदूषण कमी होईल, असे पालकमंत्री म्हणाले.
ढाकणे म्हणाले, शहराची लोकसंख्या ७० लाखांपर्यंत पोचली असून, ५५ लाख वाहनांची नोंदणी झाली आहे. बाहेरील वाहनेही मोठ्या प्रमाणात येत असल्याने प्रदूषण वाढत आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिका अनेक स्तरावर प्रयत्न करीत आहे. ई-रिक्षांना अनुदान, ई-बसचा वापर, मिस्ट बेस्ड फाउंटन अशा विविध उपाययोजना केल्या जात आहेत.