पुणे (Pune) : पुणे विमानतळाचे ‘विंटर शेड्यूल’ (Pune Airport Winter Schedule) रविवारपासून (ता. २७) सुरू होत आहे.
या शेड्यूलमध्ये पुण्याहून उड्डाणाच्या संख्येत वाढ होणार आहे. यात देशांतर्गत पाच आणि दोन आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा समावेश आहे. पुण्याहून बँकॉकची सेवा २२ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. तर २७ ऑक्टोबरपासून चेन्नई, तिरुअनंतपुरमसाठी अतिरिक्त सेवा सुरू होत आहे.
पुणे विमानतळाचा विंटर शेड्यूल अद्याप अधिकृतपणे जाहीर झाला नसला तरीही, विमानतळ प्रशासनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या शेड्यूलमध्ये सुमारे सात नवीन विमानसेवा सुरू होत आहेत. यात देशांतर्गत विमानसेवेची संख्या जास्त असणार आहे.
आंतरराष्ट्रीय सेवेत पुणे ते बँकॉक व पुणे ते दुबई या दोन सेवेचा समावेश आहे, तर देशांतर्गतमध्ये तिरुअनंतपुरम, चेन्नई यासह अन्य दोन ते तीन शहरांचा समावेश आहे.
पुणे विमानतळावर सोमवार ते शुक्रवार २१८ स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात १९५ स्लॉटचा वापर झाला आहे. उर्वरित स्लॉट रिकामेच आहे. रिकामे राहिलेल्या स्लॉटमध्ये रेड आय विमानाचा समावेश आहे. सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत पुणे विमानतळावर ११० विमानांची वाहतूक होते. याच वेळेत विमान कंपन्यांना स्लॉट हवे आहे. मात्र तो उपलब्ध झालेला नाही.
पुणे विमानतळावरून दोन आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू आहेत. यात दुबई व सिंगापूरचा समावेश आहे. बँकॉकसाठी विमानसेवा सुरू झाल्यावर पुण्याहून थायलंड हा देश जोडला जाईल. या निमित्ताने तिसरा देश हा पुण्याला जोडला जाणार आहे. बँकॉकसाठी सेवा सुरू होत असताना दुबईसाठीदेखील सेवा सुरू होत आहे. ही सेवा सुरू झाल्यावर पुण्याहून दुबईसाठी दोन विमानांची सेवा असणार आहे.
दैनंदिन ९५ विमानांचे उड्डाण
- पुण्याहून दोन्ही टर्मिनल मिळून सध्या सुमारे १९० विमानांची वाहतूक
- यात दैनंदिन सरासरी ९५ विमानांचे उड्डाण व ९५ विमानांचे लँडिंग
- प्रवासी संख्या : सरासरी ३५ हजार
विंटर शेड्यूल २७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यात काही शहरांसाठी विमानसेवा सुरू होत आहे. कोणत्या शहरांसाठी सेवा सुरू होईल हे आताच सांगता येणार नाही.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे