पुणे (Pune) : पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल ऑगस्टअखेर कार्यान्वित होणार आहे. देशांतर्गत सेवा देणाऱ्या सर्व विमानांची उड्डाणे येथून होतील. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणेही नवीन टर्मिनलवरून होण्यासाठी विमानतळ प्रशासन प्रयत्न करीत आहे. मात्र त्याला ‘इमिग्रेशन’ची मंजुरी मिळाली नाही. विकास कामांसाठी सप्टेंबरपासून किमान आठ महिने देशांतर्गत विमानांसाठी जुने टर्मिनल बंद राहणार आहे.
नवीन टर्मिनलवरून सध्या २८ विमानांचे उड्डाण होते. यात पाच विमान कंपन्यांचा समावेश आहे. ऑगस्ट अखेर सर्वच विमान कंपन्यांची सेवा नवीन टर्मिनलवरुन सुरू होईल. त्यामुळे जुने टर्मिनल प्रवाशांसाठी बंद केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी मात्र कदाचित वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासन ‘इमिग्रेशन’च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नवीन टर्मिनलमधून सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र ‘इमिग्रेशन’ने आणखी काही आक्षेप नोंदविल्यास त्यांची सेवा जुन्या टर्मिनलवरूनच सुरु राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे.
जुने टर्मिनल बंद झाल्यावर
१) जुने टर्मिनल प्रवाशांसाठी बंद झाल्यावर तेथे विकासकामे करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने जुन्या टर्मिनलच्या आगमन गेटचे रुपांतर निर्गमन गेटमध्ये केले जाणार आहे.
२) हे करत असताना पूर्वीचे चार बॅगेज बेल्ट काढून टाकण्यात येईल.
३) प्रवासी सुविधा आणखी चांगली करण्यासाठी अतिरिक्त १६ चेक इन काउंटर, पाच एक्सरे मशिनसह प्रवाशांना थांबण्यासाठी पहिल्या मजल्यावर नवीन सेक्युरिटी होल्ड एरिया तयार केले जाणार आहे. यासाठी सुमारे २५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्याच्या टेंडर प्रक्रियेला सुरवात झाली आहे.
आठ महिन्यांचा कालावधी लागणार
जुन्या टर्मिनलवर पहिल्या टप्प्यात चेक इन काउंटरचे काम केले जाईल. मात्र पहिल्या मजल्यावर सेक्युरिटी होल्ड एरिया करण्यासाठी काही महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. विमानतळ प्रशासनाने ६ ते ८ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे काम करतानाच टर्मिनलच्या समोरील मोकळ्या जागेत असलेले विविध कार्यालयाच्या इमारती पाडून समोरचा भाग मोकळा करण्यात येणार आहे.
नवीन टर्मिनल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर काही दिवसांतच जुने टर्मिनल बंद केले जाईल. त्यावेळी आगमनद्वार येथे चेक इन काउंटर वाढविण्याचे तसेच अन्य कामे केली जाणार आहेत. सुरक्षेसाठी एक्स रे मशिनची संख्या वाढवली जाणार आहे.
- संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ