पुणे (Pune) : पुणे विमानतळावरच्या (Pune Airport) कार्गो सेवेला उत्पादक व व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘बीसीएएस’ची (ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी) परवानगी मिळाल्यानंतर आता सहा कंपन्यांची कार्गो सेवा सुरू झाली आहे. १ ते २४ सप्टेंबरपर्यंत पुणे विमानतळावरून ३४ लाख किलो वजनाच्या साहित्याची विमानाने वाहतूक झाली.
सप्टेंबरअखेर हा आकडा ३६ लाख किलोच्या घरात जाईल. पूर्वी पुणे विमानतळावरून महिन्याला ३० लाख किलो साहित्याची वाहतूक होते.
कार्गो टर्मिनल सुरु झाल्याने पुण्यातील छोट्या-मोठ्या उद्योजकांना व व्यापाऱ्यांना याचा उपयोग होत आहे. विमानाने माल पाठविण्यासाठी प्रतिकिलो पाच रुपये आकारले जातात. यात सर्व करांचा समावेश आहे. पाठविणाऱ्या व येणाऱ्या मालाचे दर वेगवेगळे आहे. विमानांची वाहतूक वाढल्यास कार्गोच्या वाहतुकीचे देखील प्रमाण वाढेल.
असा आहे दर
- प्रतिकिलोचा दर पाच रुपये असला तरीही त्यासाठी १०० किलोंच्या दराची आकारणी केली जाते.
- जरी आपला माल एक किलोचा असला तरीही आपल्याकडून १०० किलोचे दर आकारले जातील.
- १०० किलोसाठी ५२५ रुपयांचे दर निश्चित.
- ज्यांचे साहित्य अथवा मालाचे वजन कमी असेल त्यांनी दुसऱ्याच्या मालासोबत आपला माल पाठविला तर त्यांना कमी रक्कम द्यावी लागेल.
एका विमानातून चार टन वाहतूक
प्रत्येक विमानाची क्षमता वेगळी असते. पुण्यातून उड्डाण घेणाऱ्या विमानांचा विचार केला तर एका विमानातून चार टन मालाची वाहतूक होते. ज्या विमानात प्रवाशांचे सामान जास्त आहे, त्या विमानात ३.५ टन माल ठेवला जातो. सामान जर कमी असेल तर मात्र चार टन मालाची वाहतूक सहज केली जाते.
वाहनांच्या सुट्या भागांची जास्त वाहतूक
पुण्यातून मोठ्या प्रमाणात वाहन उद्योगाशी निगडित असलेल्या सुट्या भागांच्या साहित्याची वाहतूक होते. त्यानंतर नाशवंत पदार्थांची वाहतूक जास्त होते. सध्या सफरचंद व फुले मोठ्या प्रमाणात दिल्ली व कोलकत्यासाठी पाठविले जात आहेत.