पुणे (Pune) : नव्या मल्टीलेव्हल पार्किंगमुळे पुणे विमानतळावरील पार्किंगचा प्रश्न सुटणार असून 'वॅले' कार पार्किंग, तसेच घरातून निघाल्यावर आपल्याला हवा असलेला पार्किंगचा स्लॉट निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे. वाहनधारकांना विमानतळ ते कार पार्किंग दरम्यान जाण्यासाठी तीन गोल्फ कारची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. यासह चालकांसाठी स्वतंत्र व मोफत राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. १२० कोटी रुपये खर्चून उभारलेले मल्टी लेव्हल कार पार्किंग येत्या दहा ते पंधरा दिवसांत खुले होणार आहे.
पुणे विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा पार्किंगचा प्रश्न आता मिटण्याच्या मार्गावर आहे. सुमारे १ हजार चारचाकी व दुचाकीची पार्किंगची सोय येथे केली आहे. उभारण्यात आलेल्या पाच मजली मॉलमध्ये विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. केवळ कार पार्किंगच नाही तर येथे फूड कोर्ट, नामांकित कपड्यांची दुकाने थाटली आहेत. मॉलमधल्या प्रतिक्षालयात विमानांची स्थिती दर्शविणारे डिस्प्ले देखील लावण्यात आले आहे. त्यामुळे विमानांच्या वेळा समजण्यात मदत होणार आहे.
‘वॅले’मुळे वेळ वाचणार
ज्या प्रवाशांना गाडी पार्किंगला स्वतःला जायचे नाही अथवा त्यांच्याकडे तेवढा वेळ नसेल, त्यांच्यासाठी विमानतळावर ‘वॅले’ सुविधा देण्यात आली आहे. तिथे उपस्थित असलेले पार्किंगचे कर्मचारी त्यांची कार घेतील व त्या बदल्यात त्यांना कुपन देतील. जेव्हा प्रवासी विमानतळावर दाखल होतील तेव्हा त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना ते कुपन दिल्यास पुन्हा कर्मचारी संबंधित प्रवाशाची कार घेऊन त्यांच्याजवळ हजर होतील. यामुळे प्रवाशांना कार पार्किंग साठी स्वतः जाण्याची गरज नाही. मात्र ही विशेष सुविधा असल्याने यासाठी प्रवाशांना थोडे जास्तीचे पैसे मोजावे लागतील.
पार्किंगची जागा ठरविता येणार
मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरबसल्या पार्किंगचा स्लॉट बुक करता येणार आहे. त्यामुळे पार्किंग फुल्ल होण्याची चिंता नाही. प्रवाशांना सुविधा देताना नव्या संकल्पनांचा विचार करण्यात आला आहे. पार्किंगचा स्लॉट बुक करून ठेवणे, यासह पार्किंग शुल्क देताना फास्टॅगचा वापर केला जाणार आहे.
पार्किंग संदर्भातल्या सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्यांची सोय तर होईलच शिवाय अन्य सुविधांचा देखील लाभ घेता येणार आहे. काही तांत्रिक मंजुरी अद्याप मिळालेली नाही. येत्या १० ते १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि हा मॉल सर्वांसाठी खुला होईल.
- वाय. एस. राजपूत, उपाध्यक्ष, मल्टी लेव्हल कार पार्किंग, पुणे विमानतळ