पुणे, ता. २३ ः पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण होणार आहे. पुणे विमानतळाला जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे, या प्रस्तावाला राज्य सरकारने सोमवारी मंजुरी दिली.
अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. केंद्रीय विमान नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे विमानतळाला तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी सर्वप्रथम मागणी केली होती.
मोहोळ यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि पुणे विमानतळाच्या नामकरणावर सविस्तर चर्चा केली होती.
लोहगाव हे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे आजोळ होते. त्यामुळे लोहगाव आणि तुकाराम महाराज यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. तसेच नुकतेच पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाच्या नामकरणाला सहमती दर्शवत राज्य सरकार मंजुरी देणार असल्याचे सांगितले होते.