पुणे (Pune) : एरोमॉलमधून इच्छितस्थळी जाण्यासाठी आता कॅबची वाट पाहावी लागणार नाही. कारण विमानतळ प्राधिकरणाच्या एरोमॉल प्रशासनाने ‘पिन’ आधारित कॅबसेवा सुरू केली आहे. यामध्ये प्रवाशांना ‘पिन क्रमांक’ मिळेल, तो कॅबचालकाला दिल्यावर इच्छितस्थळी जाता येणार आहे.
पुण्यात विमानाने येणाऱ्या प्रवाशांना कॅबने इच्छितस्थळी जाण्यासाठी एरोमॉलमध्ये जावे लागते. तेथे गेल्यावर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. कॅबची वाट पाहत अर्धा ते पाऊण तास थांबावे लागत होते. विशेषतः मध्यरात्री प्रवाशांची मोठी गैरसोय व्हायची.
विमानाला उशीर झाल्यास कॅब बुक करणे अवघड व्हायचे. त्यामुळे प्रवाशांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली. विमानतळ प्रशासनाकडे तक्रारीही केल्या. त्यावर आता विमानतळ प्रशासनाने तोडगा शोधला आहे.
‘पिन’ आधारित सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना कॅबसाठी वाट पहावी लागणार नाही. मागील आठवड्यात ही सेवा सुरू झाली असून, २५ टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे, असे एरोमॉल प्रशासनाने सांगितले.
...असे काम करेल
१. एरोमॉलमध्ये उपलब्ध असलेल्या कॅबसाठी पिन क्रमांक दिला जाईल
२. पिन क्रमांक ॲपमध्ये समाविष्ट केल्यावर कॅबकडून प्रवासी सेवा दिली जाईल
प्रवाशांसाठी फायद्याचे...
१. पूर्वीप्रमाणे आता कॅबची वाट पहावी लागणार नाही
२. प्रवाशांच्या वेळेत बचत होईल
३. जवळचे ठिकाण असले, तरीही कॅबचालकांना प्रवाशांना इच्छितस्थळी सोडणे अनिवार्य
४. कुठे जायचे आहे, हे कॅबचालकांना आधी समजत नाही; प्रवासी गाडीत बसल्यावर लोकेशन कळते
५. परिणामी जवळचे ठिकाण असले, तरीही कॅबचालकांना बुकिंग नाकारता येणार नाही
एका दिवसात...
- ५००० : कॅबची ये-जा (दैनंदिन)
- ९,००० : प्रवासी वाहतूक (दैनंदिन)
- २५ टक्के : पिन सेवेचा वापर करणारे प्रवासी
या सेवेसाठी प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यायचे नाही. पिन आधारित व सामान्य बुकिंग प्रणाली दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
- व्ही. रजपूत, उपाध्यक्ष, एरोमॉल, पुणे विमानतळ