पुणे (Pune) : कृषी महाविद्यालयातील बोटॅनिकल गार्डनमधील मैलापाणी शुद्धीकरण केंद्रासाठी (एसटीपी - STP) जागेच्या अंतिम मान्यतेच्या प्रस्तावाबाबत तांत्रिक सबबी देत वन विभागासह राज्य जैवविविधता मंडळाने सुमारे दीड वर्षे टोलवाटोलवी केली.
अखेर राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सभेत यासाठी ३० गुंठे जागा देण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळाली. यास राज्य शासनाने मान्यता द्यावी, अशीही शिफारस करण्यात आली. त्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
शहरातील मैलापाणी व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘जायका’च्या (जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी) आर्थिक सहकार्याने केंद्र सरकार हा प्रकल्प उभारत आहे. त्याअंतर्गत शहरातील ११ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे (एसटीपी) उभारण्यात येत आहेत.
पुणे महापालिकेने सुरू केलेली दहा केंद्रांची कामे प्रगतिपथावर आहेत. कृषी महाविद्यालयातील केंद्राचे काम मात्र रखडले होते. या पर्यावरणपूरक प्रकल्पासाठी इतर विभाग अडथळे आणले जात होते.
बोटॅनिकल गार्डनमधील जागेवर महापालिकेचे पंपिंग स्टेशन आहे. ही जागा मैलापाणी शुद्धीकरण केंद्र आणि जोड रस्त्यासाठी महापालिकेने विकास आराखड्यामध्ये आरक्षित केली होती. मात्र, संबंधित ठिकाण वन विभागाने जैवविविधता वारसा क्षेत्र म्हणून जाहीर केल्याने महापालिकेला तांत्रिक अडचण येत होती.
केंद्र सरकारच्या पथकाने मागील वर्षी प्रकल्पाचा आढावा घेत ही अडचण दूर करण्याची सूचना राज्य सरकारला दिली होती. त्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईत वन विभागाच्या प्रधान सचिवांच्या कार्यालयात प्रधान मुख्य वन संरक्षक, राज्य जैवविविधता मंडळाचे सचिव, प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक, महापालिकेचे आयुक्त, मुख्य अभियंता, उपवनसंरक्षक व राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संशोधन संचालक अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यात ही जागा जैवविविधता वारसा क्षेत्रामधून वगळण्याचा सुधारित प्रस्ताव पाठविण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार सुधारित प्रस्ताव नागपूरमधील राज्य जैवविविधता मंडळाला सादर करण्यात आला.
या मंडळाने जागा देण्याबाबत हरकत नसल्याचा सकारात्मक आदेश दिला. मात्र, हा आदेश स्पष्ट नसल्याने पाठपुरावा करू, अशी भूमिका वन विभागाने घेतली. या दोन संस्थांमधील टोलवाटोलवीमुळे महापालिकेचे अधिकारीही त्रस्त झाले होते.
अखेर राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने महापालिकेच्या अंतिम मान्यतेच्या प्रस्तावावर चर्चा केली. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत राज्य सरकारच्या मान्यतेसाठी शिफारस करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बोटॅनिकल गार्डनमध्ये मैलापाणी शुद्धीकरण केंद्रासाठी जागा देण्याच्या प्रस्तावावर राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सभेत मान्यता मिळाली आहे. आता राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर या केंद्राचे काम मार्गी लागू शकते.
- जगदीश खानोरे, प्रकल्प समन्वयक, जायका, महापालिका
‘जायका’अंतर्गत या केंद्रांची कामे सुरू
१) नायडू रुग्णालय
२) भैरोबा नाला
३) धानोरी
४) खराडी
५) वारजे
६) वडगाव
७) बाणेर
८) मुंढवा
९) वाकडेवाडी
१०) मत्स्यबीज केंद्र