पुणे (Pune) : खडकवासला धरणाच्या २३ किलोमीटर लांबीच्या पाणलोट क्षेत्रात येणारे सांडपाणी रोखण्याबरोबरच त्यावर उपाययोजना करण्यासाठी ‘सर्वंकष प्रकल्प आराखडा’ (डीपीआर) तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पीएमआरडीए आणि जिल्हा परिषदेच्या वतीने हा आराखडा तयार करण्यात येत असून, त्यात आवश्यक तेथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे, अधिकृत बांधकामांवर कारवाई आदी उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी खडकवासला हे एक धरण आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या आजूबाजूच्या गावांमधून, तसेच पाणलोट क्षेत्राच्या परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकामांचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर धरणात येत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अधिकारी श्वेता कुऱ्हाडे यांनी दिली.
पाणलोट क्षेत्रात नेमके किती पाणी मिसळते, हे पाणी कुठून येते, यांचे सर्वेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास सांगण्यात आले होते. परंतु मंडळाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे पीएमआरडीए आणि जिल्हा परिषदेने मदत करावी, असे ठरले होते. त्यानुसार सल्लागार नेमून डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एक महिन्याच्या आत संबंधित सल्लागार कंपनीने अहवाल सादर करावा, असेही या बैठकीत ठरले.
धरणाच्या पाणलोट क्षेत्राची व्याप्ती २३ किलोमीटर आहे. धरण क्षेत्रात १९ गावांचा समावेश होतो. या गावांमधील घरे, हॉटेल, रिसॉर्ट, बंगलो आणि कंपन्या यांच्याकडून निर्माण झालेले सांडपाणी धरणाच्या पाण्यात मिसळून प्रदूषण होते का, त्याचे प्रमाण किती आहे, त्यावर काय उपाययोजना करता येतील, याचा समावेश या अहवालात असणार आहे. याशिवाय धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकामांचे देखील सर्वेक्षण केले जाणार आहे.
या उपाययोजना होणार
- दोन ते तीन गावांचे मिळून पाणी शुद्धीकरण प्रकल्प बांधणे
- धरणाचे जुने नकाशे काढून स्थळपाहणी करणे
- अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे
- धरण व धरणाभोवती साचलेला गाळ काढून गाळमुक्त धरण करणे
- धरणाची हद्द सुरक्षित करण्यासाठी सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, माहिती फलक, आवश्यक तेथे संरक्षक भिंत उभारणे