पुणे (Pune) : विधानसभेचे निकालांपूर्वीच राज्यात ‘सीएनजी’च्या (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस - CNG) दरात वाढ झाली आहे.
पेट्रोल (Petrol), डिझेलचे (diesel) दर वाढले म्हणून वाहनचालक ‘सीएनजी’कडे वळले आहेत. त्यात आता ‘सीएनजी’च्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे. त्यामुळे त्यांची अवस्था दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे.
शहर गॅस वितरण (सीजीडी) आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) ‘सीएनजी’च्या दरात प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली. नवीन दर शुक्रवारपासून (ता. २२) लागू झाले असून, पुणे आणि परिसरात दर ८७.९० रुपये प्रतिकिलो झाला आहे. या वाढीमुळे ‘सीएनजी’वर धावणाऱ्या वाहनांच्या खर्चात वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नैसर्गिक वायूच्या इनपुट खर्चात वाढ झाली आहे. या सर्व कारणांमुळे ‘एमएनजीएल’ने ‘सीएनजी’च्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा ग्राहकांवर बोजा वाढणार आहे. या वाढीमुळे सीएनजी वाहनचालकांच्या खिशाला थेट फटका बसणार आहे.
ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संचालन खर्चात वाढ झाल्याने भाडे वाढण्याची शक्यता आहे. आधीच वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहक आणि व्यावसायिकांसमोर ही वाढ आणखी एक आव्हान म्हणून समोर आली आहे.
शहरात साधारण सर्व रिक्षा ‘सीएनजी’वर चालतात. यामुळे ही दरवाढ आमच्यासाठी खिशाला चटका देणारी आहे. याकडे शासनाने गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे. कारण सार्वजनिक आणि खासगी वाहतूक ‘सीएनजी’वर अवलंबून आहे. दरात वाढ झाल्यामुळे व्यवसाय करणे आमच्यासाठी अशक्य झाले आहे.
- खालिद शेख, रिक्षाचालक
जागतिक स्थरावर निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे दरवाढ झाली आहे. ही दरवाढ तत्कालीन स्वरूपाची असून येणाऱ्या काळामध्ये ‘सीएनजी’चे दर कमी होण्याची शक्यता आहे.
- अली दारूवाला, प्रवक्ता, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन