पुणे (Pune) : चांदणी चौकात सध्या बहुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे. सुट्यांच्या दिवशी आणि दर शनिवार-रविवारी या रस्त्यावर चांदणी चौकात होणाऱ्या कोंडीमुळे तब्बल एक ते दीड किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागतात. विशेषतः रात्री नऊ ते बारा दरम्यान कोंडी तीव्र होते. रोजच्या या वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या वाहनचालकांनी गेल्या आठवड्यात एकाच वेळी सतत हॉर्न वाजवून पोलिसांना जागे करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हिंजवडी वाहतूक विभागाच्या पोलिसांनी उपाययोजना केल्या. परंतु, वाहनांची संख्या मोठी असल्याने त्या उपाययोजना अपुऱ्या ठरल्या आहेत.
मुंबईहून आपल्या नातवंडांसमवेत कारने निघालेले ज्येष्ठ नागरीक सुमारे तीन तासांत रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास बावधनजवळ पोचले. मात्र तेथून सिंहगड रस्त्यावर पोचण्यासाठी त्यांना एक तासांपेक्षा जास्त वेळ लागला. एरवी हे अंतर अवघ्या २० मिनिटांत पार होते. या विलंबाचे कारण म्हणजे मुंबई-बंगळुरु महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी. दररोज हजारो वाहनचालक चांदणी चौकातील कोंडीत अडकतात. वाहतूक पोलिसांनी या बाबत केलेल्या उपाययोजना वाहनांच्या संख्येपुढे कुचकामी ठरत आहेत.
म्हणून होते कोंडी
चांदणी चौकामध्ये उड्डाणपूल, रस्ता रुंदीकरणाची कामे सुरु आहेत. त्यामुळे मुळशी, पौडवरून येणारी वाहने बाणेर, बावधन रस्त्याने चांदणी चौकाजवळच महामार्गाला मिळतात. त्यातच मुंबईहून येणारी वाहनांची संख्या जास्त असते. मात्र चांदणी चौकातील पुलाखालून एकावेळेला केवळ एक अवजड वाहन व एक ते दोन छोटे चारचाकी वाहने जाण्याइतकाच रस्ता आहे. पुलाजवळ रस्ता अरुंद होत असल्याने (बॉटलनेक) वाहनांची गर्दी होऊन वाहनांच्या रांगा लागतात. महामार्गावर बावधन, पाषाण तलावापर्यंत या रांगा कायम राहतात. त्यातच काही वाहने उलट्या दिशेने जाणे, चुकीच्या पद्धतीने वाहने लावणे, वाहन बंद पडणे, वाहनचालकांची भांडणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे कोंडीत भर पडत आहे.
पोलिस, वॉर्डन गेल्यानंतर उडतोय वाहतुकीचा गोंधळ
मुळशी, पौडवरुन बावधन मार्गे विवा हॉटेलसमोरुन महामार्गाला मिळणाऱ्या वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे हिंजवडी वाहतूक पोलिसांनी बाणेर, बावधनवरुन येणाऱ्या वाहतुकीला सध्या ३० ते ४० सेकंद इतका वेळ, तर महामार्गावरुन मुंबईहून सातारा, कोल्हापुरला जाणाऱ्या वाहतुकीसाठी १ ते दीड मिनिटे वेळ दिला. त्यानुसार दोन्हीकडील वाहने सोडली जातात. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे, त्यांचे पोलिस कर्मचारी व वॉर्डन यांच्याकडून वाहतुक नियमन केले जाते. त्यामुळे रात्री नऊपर्यंत महामार्गावरील वाहतूक किमान हळुहळू पुढे सरकते. सलग सुट्ट्यांच्या दिवशी कोंडी वाढत जाते. त्यामुळे रात्रीच्यावेळीही पोलिस, वॉर्डन थांबविण्याची गरज आहे.
केलेल्या उपाययोजना
- चांदणी चौकातुन कोथरूडकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला
- बावधनकडून चांदणी चौकाकडे वळतानाच्या रस्त्यावरील बॅरीकेडस् हटविले
- महामार्गावरील ठिकठिकाणचे ‘पंक्चर’ बंद केले
- दुभाजकांमधील ‘पंक्चर’ही बंद केले
- आवश्यक ठिकाणी रस्ते दुरुस्त करुन वाहनांसाठी रस्ता मोकळा केला
उड्डाणपूल, रस्त्याची कामे, ठिकठिकाणचे पंक्चर व बेशिस्त वाहनचालक अशा वेगवेगळ्या कारणांमुळे चांदणी चौकात वाहतूक कोंडी होत होती. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे व मी पाहणी केली. त्यानुसार, काही महत्त्वपूर्ण उपाययोजना आम्ही केल्या. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत आता कोंडी कमी होत आहे.
- विठ्ठल कुबडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी वाहतूक विभाग