पुणे (Pune) : शैक्षणिक कारणांसाठी (Educational Purpose) हद्दीत राखीव असलेले सुमारे १७ भूखंड भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (PMRDA) घेतला आहे. त्यानुसार इच्छुक संस्था आणि व्यक्तींकडून टेंडर मागविले आहेत. हे भूखंड तीस वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहेत.
पीएमआरडीएच्या हद्दीतील मावळ, मुळशी आणि हवेली (Maval, Mulshi and Haweli) तालुक्यातील १७ गावांमधील हे भूखंड आहेत. अमेनिटी स्पेसच्या माध्यमातून या जागा पीएमआरडीएच्या ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांना उद्यापासून एक महिन्यांच्या आत ऑनलाइन पद्धतीने या लिलावात भाग घेता येणार आहे. प्राथमिक शाळा आणि महाविद्यालयांसाठी हे भूखंड भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.
ॲमेनिटी स्पेसच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पीएमआरडीएच्या ताब्यात मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात शैक्षणिक क्षेत्रासाठी राखीव असलेल्या भूखंड भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. या निर्णयामुळे पीएमआरडीएच्या हद्दीत शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
पीएमआरडीएकडून यापूर्वी ही भूखंडांची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे ती थांबविण्यात आली होती. आता मात्र विशिष्ट क्षेत्रासाठी राखीव असलेले भूखंड लिलावाद्वारे भाडेपट्टाने देण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक भूखंडाचा भाडेपट्टाही पीएमआरडीएकडून निश्चित करण्यात आला आहे.