पुणे (Pune) : ‘पीएमपी’चे अपघात रोखण्यासाठी चालकांना प्रशिक्षण देणे, तसेच ठेकेदारांच्या बसच्या देखभाल व दुरुस्तीवर देखील प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. ‘पीएमपी’ने निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचे एक पथक तयार केले असून त्यामार्फत ठेकेदारांच्या बसची पाहणी केली जाणार आहे. यापूर्वी ‘पीएमपी’ केवळ आपल्या मालकीच्या बसची देखभाल, दुरुस्तीकडे लक्ष देत, आता पहिल्यांदाच ठेकेदारांच्या बसवर देखील लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे बसचे ब्रेकडाऊन व अपघात रोखण्यास मदत मिळेल.
काय आहे स्थिती?
- चालू वर्षात ‘पीएमपी’च्या १३३ बसचा अपघात
- यातील बहुतांश बस ठेकेदारांच्या मालकीच्या
- रविवारी झालेल्या दोन्ही अपघातातील बस ठेकेदारांच्या
- यामुळे ठेकेदारांच्या बसच्या देखभाल, दुरुस्तीचा प्रश्न गंभीर
काय उपाय केलेत?
- ‘पीएमपी’च्या अध्यक्षांकडून ठेकेदारांच्या बसवर लक्ष केंद्रित
- सुरवातीला त्यांच्या चालकांना प्रशिक्षण दिले जाणार
- बसची निगा योग्य राखली जाते की नाही, हे पहिले जाणार
- बस चालकांच्या प्रशिक्षणास सुरवात
निवृत्त अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण
‘पीएमपी’ने चालकांचा दर्जा सुधारण्यासाठी आपल्याच निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ते सध्या विविध डेपोत जाऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आहेत. सुरक्षित वाहतुकीसाठी काय केले पाहिजे, कोणत्या चुका टाळायला हव्यात आदींसह अन्य बाबीवर मार्गदर्शन केले जात आहे. शिवाय ‘पीएमपी’ व ठेकेदारांच्या चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेची (सीआयआरटी) मदत घेतली जात आहे. ‘सीआयआरटी’ तीन दिवसीय अभ्यासक्रम तयार करीत आहे. लवकरच चालकांच्या प्रशिक्षणास सुरवात होईल.
अपघात रोखण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर काम केले जात आहे. शिवाय ठेकेदारांच्या बसची देखभाल, दुरुस्तीच्या कामाची पाहणी देखील ‘पीएमपी’चे अधिकारी करणार आहेत.
- सचिंद्र प्रताप सिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे