पुणे (Pune) : पुण्यात पहिल्यांदाच ‘बीआरटी’साठी (BRT) सिंगल लाईनचा विचार झाला आहे. कोथरूडसारख्या (Kothrud) महत्त्वाच्या मार्गावरून जागेची कमतरता लक्षात घेता ‘PMP’ने डेक्कन कॉर्नर ते माळवाडी व डेक्कन कॉर्नर ते चांदणी चौक मार्गावर सिंगल लाईन बीआरटी सुरू करण्याचा विचार केला आहे, याच्या सर्वेक्षणालाही सुरवात झाली आहे. येत्या काही दिवसांत यावर निर्णय अपेक्षित आहे. (Single Line BRT)
प्रवासी वाहतूक गतीने व विना अडथळ्याद्वारे व्हावी, यासाठी ‘पीएमपी’ने बीआरटीतून वाहतूक सुरू केली. आता पुण्यात आठ मार्गांवर बीआरटी आहे. या सर्व दुहेरी वाहतुकीसाठी वापरल्या जातात. दुहेरी वाहतुकीसाठी जास्त जागा लागते. त्यामुळे तुलनेने कमी जागा असलेल्या रस्त्यांवर बीआरटी सुरू करता आली नाही. मात्र, आता ‘पीएमपी’ने यावर उपाय शोधला असून, ज्या रस्त्यावर कमी जागा उपलब्ध आहे. अशा रस्त्यांवर एकेरी म्हणजेच सिंगल लाईन बीआरटी सुरू करण्याची शक्यता आहे. पीएमपी प्रशासनाने त्यादृष्टीने कार्यवाहीस ही सुरवात केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत एकेरी बीआरटी मार्गावरून पीएमपीची बस वाहतूक सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
या दोन मार्गांचे सर्वेक्षण सुरू
डेक्कन कॉर्नर ते माळवाडी व्हाया गणपती माथा व डेक्कन कॉर्नर ते चांदणी चौक व्हाया कोथरूड डेपो या दोन मार्गांचे सर्वेक्षण सुरू झाले. बीआरटी विभागाच्या वतीने सर्वेक्षण केले जात आहे. यात प्रामुख्याने रस्त्याची रुंदी, त्या रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या, पीएमपी बसची संख्या, कोणत्या ठिकाणी थांबा घेणे याचा विचार केला जात आहे. बीआरटी केल्यावर वेळेत किती बचत होऊ शकते, याचाही विचार केला जात आहे. येत्या १० ते १५ दिवसांत या दोन्ही रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल ‘पीएमपी’च्या अध्यक्षांना दिला जाणार आहे.
१२ मिनिटांची बचत, तर ३.५ मीटर जागा
दुहेरी वाहतुकीसाठी बीआरटी मार्ग बांधायचा असेल, तर किमान ७ मीटर जागा लागते. तर एकेरी वाहतुकीसाठी बीआरटी मार्ग तयार करायचा असेल, तर ३. ५ मीटर इतकी जागा लागते. यात बस थांब्याचादेखील विचार केला आहे. कोथरूडसारख्या गजबजलेल्या रस्त्यावर बीआरटी करताना प्रामुख्याने तो एकेरी असेल यात शंका नाही. लवकरच बोर्ड मीटिंगमध्ये यावर निर्णय अपेक्षित आहे.
दोन नव्या मार्गांवर एकेरी बीआरटी सुरू करण्याचा विचार आहे. त्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. ज्या रस्त्यांची रुंदी कमी आहे, अशा रस्त्यांवर एकेरी बीआरटी योग्य ठरेल.
- डॉ. लक्ष्मीनारायण मिश्रा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी, पुणे