पुणे (Pune) : पुणे महापालिकेने कितीही दावे केले तरी पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी पुणेकरांची हाडे खिळखिळी झाली आहेत. विक्रमी वेगाने रस्त्यांतील खड्डे बुजविल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेच्या खड्डे बुजविणाऱ्या पथकालाच पुण्यातील रस्त्यांच्या दर्जाचा फटका बसला. महापालिकेच्या पथ विभागाचा खड्डे बुजविणारा ‘जेटपॅचर’ ट्रक बीएमसीसी रस्त्यावरून जात असताना अचानक रस्ता खचला. रस्त्यावरील खड्ड्यात जवळपास दोन तास हा ट्रक अडकून पडल्याने मोठी कोंडी झाली होती. यातून रस्त्यांचा दर्जा किती निकृष्ट आहे याचे ताजे उदाहरण समोर आले आहे. पुण्यातील रस्त्यांत खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ते आहेत, अशी परिस्थिती सर्वत्र दिसते आहे.
महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेसाठी शहरातील बहुतांश रस्ते खोदले आहेत. हे रस्ते पूर्ववत केले असले तरी त्यांचा दर्जा योग्य नाही. मुरूम, खडी टाकून व्यवस्थित दबाई न करता सिमेंट काँक्रिटने रस्ते बुजविण्यात आले आहेत. यामुळेच शहरातील बहुतांश रस्ते खराब झाले आहेत. पाऊस थांबल्याने महापालिकेने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले असले तरी समस्या पूर्ण सुटलेली नाही. या ठिकाणी महापालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर ठेकेदाराने क्रेन मागवून हा ट्रक दोन तासांच्या प्रयत्नानंतर ट्रक बाहेर काढला.
मंगळवारी दुपारी बीएमसीसी रस्त्यावर जेटपॅचर ट्रक खड्ड्यात अडकला. या ठिकाणी समान पाणीपुरवठ्याचे काम झाले असून, तेथे रस्ता बुजविताना व्यवस्थित मुरूम, खडी टाकून दबाई न करता सिमेंट काँक्रिट टाकल्याने ट्रकच्या वजनाने हा रस्ता खचला. हे काम योग्य पद्धतीने न झाल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यास पाणीपुरवठा विभागाला सांगण्यात आले आहे.
- दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग