पुणे (Pune) : उरुळी देवाची, फुरसुंगी कचरा डेपोतील जैविक उत्खननाचे (बायोमायनिंग) टेंडर काढण्यापूर्वी त्यात माती किती, कचरा किती, याची तपासणी करावी. यापूर्वी काढलेल्या टेंडरची चौकशी करावी. या मागणीसाठी पुणे शहर काँग्रेस व्यापारी सेलचे अध्यक्ष भरत सुराणा यांनी महापालिका भवनासमोर उपोषण केले.
कचरा डेपोतील कचऱ्याचे बायोमायनिंग करताना त्यात पुणे महापालिकेचे शेकडो कोटी रुपये खर्च होत आहेत. यामध्ये ७० टक्के माती व ३० टक्के कचऱ्याचे प्रमाण असल्याने करदात्या पुणेकरांचे हित जपले जात नाही. या कचरा डेपोत अजूनही सुमारे २१ लाख मेट्रिक टन कचरा पडून आहे, त्याचे टेंडर काढण्यापूर्वी महापालिकेने कचरा किती व माती किती, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे, अशी मागणी केली जात आहे.
या संदर्भात सुराणा यांनी महापालिकेसमोर उपोषण केले. राष्ट्रीय हरित लवादाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात किती टन कचरा दाखविला व आतापर्यंत किती टन कचऱ्याचे बायोमायनिंग झाले? याची चौकशी करावी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डामार्फत कचऱ्याची तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.