पुणे (Pune) : पुणे महापालिकेच्यावतीने (PMC) सारसबाग (Sarasbagh) चौपाटी येथे सुशोभीकरणासह वॉकिंग प्लाझाच्या (Walking Plaza) कामाला आता आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने वॉकिंग प्लाझाचे काम करता येणार नाही, त्यामुळे पोटनिवडणूक झाल्यानंतरच कामाला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.
सारसबाग चौपाटीवरील वाढत्या अतिक्रमणांची गांभीर्याने दखल घेत महापालिका प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी तेथे अतिक्रमण कारवाई करून वाढीव क्षेत्र वापरल्याने ५२ स्टॉल बंद केले होते. संबंधित व्यावसायिकांना वारंवार सूचना देऊनही नियमांचे पालन होत नसल्याने महापालिकेने कडक कारवाई केली होती. संबंधित व्यावसायिकांकडून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी आयुक्तांकडे केली जात होती.
त्याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अतिक्रमण टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्याचवेळी चौपाटीचे सुशोभीकरण, स्टॉलची एकसारखी रचना, नागरिकांना चालण्यासह बसण्यासाठी खास जागा, असे नियोजन करण्यात आले आहे.
महापालिकेने सारसबाग पुनर्विकास आराखडा तयार केला आहे, त्याच्या दृकश्राव्य सादरीकरणानंतर त्यामध्ये काही बदल सुचविण्यात आले होते. त्यानुसार, आवश्यक बदल करून आराखड्यास ६ जानेवारी रोजी अंतिम स्वरूप देण्यात आले होते.
एकीकडे महापालिका प्रशासनाकडून सारसबाग पुनर्विकास आराखडा व वॉकिंग प्लाझाच्या कामाचे नियोजन आत्तापर्यंत करण्यात आले होते. त्यानुसार, लवकरच त्याचे काम देखील सुरू होणार होते. मात्र कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतेच निधन झाल्याने तेथे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्याचे आयोगाने काही दिवसांपूर्वीच जाहीर केले. त्यानुसार, सध्या आचारसंहिता सुरू असल्याने आणि सारसबाग परिसर कसबा विधानसभा मतदारसंघात येत असल्याने सारसबाग पुनर्विकासाचे काम आता पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.
सारसबाग चौपाटी परिसर हा कसबा विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागल्याने, आचारसंहितेमुळे सारसबाग पुनर्विकास व वॉकिंग प्लाझाचे काम पोटनिवडणुकीनंतर होऊ शकेल.
- विक्रम कुमार, महापालिका आयुक्त