पुणे (Pune) : महापालिकेने जायका, नदी सुधार यासारखे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत, या प्रकल्पांना अधिक गती देऊन ते पुढे नेण्यास यावर्षी प्राधान्य देण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी (Traffic) व हॉकर्सचा प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने अर्थसंकल्पात (PMC Budget) भर दिला आहे. याबरोबरच महापालिकेत समाविष्ट २३ गावांना निधी उपलब्ध करून त्यांच्या विकासाकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार यांनी शुक्रवारी अंदाजपत्रक सादर करताना स्पष्ट केले.
विक्रम कुमार यांनी सलग दुसऱ्या वर्षी प्रशासक म्हणून अंदाजपत्रक सादर केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत विक्रम कुमार यांनी अंदाजपत्रकातील विविध प्रश्न व मुद्यांचा आढावा घेतला. विक्रम कुमार म्हणाले, मागील वर्षी आठ हजार कोटींचे अंदाजपत्रक होते. यावर्षी नऊ हजार ५१५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे.
पाणी पुरवठा, रस्ते, ड्रेनेज, वाहतूक कोंडी, रुग्णालये यावर सर्वाधिक भर देण्यात येणार आहे. पाणी पुरवठ्यामध्ये २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना यावर्षी पूर्ण करायची आहे. शहराच्या प्रत्येक भागात समान पाणी पुरवठा झाला पाहिजे. २४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत हे काम पूर्ण होईल, त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
रस्ते व अन्य कामांबाबत विक्रम कुमार म्हणाले, रस्त्यांच्या कामांसाठी देखील भरीव म्हणजे सुमारे ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रस्ते सुधारणा, नवीन रस्ते, दुरुस्तीच्या कामांना त्यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. महापालिकेत समाविष्ट नवीन गावांच्या ड्रेनेजची व्यवस्था, तेथील सुवेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी) यांसारख्या सुविधांवरही भर देण्यात आला आहे.
वाहतूक कोंडी शहराची समस्या आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी आठ नवीन उड्डाणपूल व ग्रेड सेप्रेटर ठरविण्यात आले आहे. त्याची कामे यावर्षी पूर्ण होतील. त्यासाठीही आर्थिक तरतूद केली आहे. महापालिकेने वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले आहे, त्यासाठीच्या विविध कामांच्या टेंडर प्रक्रिया पूर्ण करून कामांना सुरवात केली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार व निवृत्तीवेतनावर सर्वाधिक खर्च होतो. यावेळी हा खर्च तीन हजार कोटी रुपये इतका आहे.
- विक्रम कुमार, आयुक्त व प्रशासक, पुणे महापालिका