पुणे (Pune) : पुणे शहरातील प्रमुख रस्ते सिमेंटचे करून जवळपास १५ वर्षे उलटून गेली आहेत, पण या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे महापालिका ढुंकूनही पाहत नाही. एकीकडे डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविताना महापालिकेच्या नाकीनऊ आलेले असताना दुसरीकडे सिमेंट रस्त्याच्या ब्लॉकमध्ये पडलेल्या भेगा, पेव्हींग ब्लॉक व रस्ता समपातळीमध्ये नसल्याने दुचाकी घसरून पडत आहेत. पावसाळ्यात या भेगांचा भयंकर त्रास दुचाकीस्वारांना सहन करावा लागणार आहे. महापालिकेने सिमेंट रस्त्याच्या दुरुस्तीचे नियोजन केले असले तरी त्यासाठी अजून किमान दोन महिने वाट पहावी लागेल. (Pune City Roads news)
डांबरी रस्त्यांना पडणारे खड्डे व दरवर्षी त्यावर देखभाल दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे पुणे महापालिकेने शहरातील प्रमुख मोठे रस्ते सिमेंटचे करण्याचा निर्णय घेतला. २००५ पासून महापालिकेने टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्यास सुरवात केली. यामध्ये १२ मीटरपेक्षा मोठ्या रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्त्यांचाही समावेश आहे. सिमेंटचा रस्ता केल्याने ते पावसाळ्यात खराब होत नाहीत, खड्डे पडत नाहीत त्यामुळे या रस्त्यांचे आयुष्य जास्त असल्याचे सांगितले जाते.
महापालिकेने गेल्या १७ वर्षांत तब्बल ४०० किलोमीटरचे सिमेंटचे रस्ते तयार केले. यामध्ये सोलापूर रस्ता, सातारा रस्ता, नगर रस्ता, बाणेर-बालेवाडी, औंध रस्ता, सिंहगड रस्ता, पौड रस्ता यासह इतर प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. पण हे रस्ते आता दुकाचीस्वारांसाठी धोकादायक झाले आहेत.
अपघाताचा धोका का?
- सिमेंटच्या रस्त्याच्या एका बाजूने किमान तीन लेन असतात
- एक लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये जाताना ब्लॉकमधील भेगांचे अंतर वाढले आहे
- अनेकदा लेन बदलताना त्यावरून दुचाकीस्वारांचे नियंत्रण जाते
- ज्या दुचाकींचे चाक छोटे आहे, त्यांना यांचा जास्त त्रास होतो
- पादचारी मार्ग आणि रस्ता यामध्ये पेव्हींग ब्लॉक टाकलेले असतात, हे ब्लॉक आणि रस्ता एका पातळीत नसतो
- रस्ता वर आणि ब्लॉक खाली असतो
- अशा ठिकाणांवरून दुचाकी घसरून दुचाकीस्वार पडतात
- सिमेंटच्या रस्त्याला आडवे तडे गेले आहेत तिथे दुरुस्ती केली जात नसल्याने त्यातील अंतर देखील वाढत आहे
दुरुस्तीसाठी विशिष्ट केमिकल
सिमेंट रस्त्याच्या ज्वॉईंटमधील अंतर कमी करण्यासाठी फॉले सल्फाईड सिलेंट हे डांबरा सारखे दिसणारे केमिकल, तर सिमेंटचा रस्ता खचणे, तडे पडणे येथे दुरुस्तीसाठी ‘लो व्हिस्कॉसिटी इपोक्सी ग्राऊंट मॉर्टर’ हे सिमेंटचे विशिष्ट प्रकारचे केमिकल वापरले जाते.
सिमेंट रस्त्यांच्या ज्वॉईंटमध्ये पडलेल्या भेगा आणि रस्त्यांना तडे गेल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी पथ विभागाकडून पूर्व व पश्चिम विभागासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचे टेंडर काढले जाणार आहे. शहरातील प्रमुख १५ रस्त्यांवर लवकरच काम सुरू केले जाईल.
- अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग
पुणे शहरातील रस्ते
शहरातील एकूण रस्त्यांची लांबी - १४०० किलोमीटर
डांबरी रस्ते - ९०० किलोमीटर
सिमेंट काँक्रिटचे रस्ते - ४०० किलोमीटर
विकसित न झालेले रस्ते - १०० किलोमीटर
सिमेंट रस्ता तयार करण्याचा प्रति चौरस मिटर खर्च - ५००० रुपये
डांबरी रस्ता तयार करण्याचा प्रति चौरस मिटर खर्च - ३५०० रुपये
पेव्हींग ब्लॉक डक्टसह चौरस मिटर खर्च - ७५०० रुपये