पुणे (Pune) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे एक ऑगस्टला पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या कार्यक्रमाचे स्थळ अद्याप निश्चित झालेले नाही. या पार्श्वभूमीवर लोहगाव विमानतळापासून (Lohegaon Airport) शहरात येणाऱ्या मार्गावरील कामे त्वरित बंद करावीत, तसेच नवीन कामे काढू नयेत, असा आदेश महापालिकेने (PMC) काढला आहे.
पंतप्रधान मोदी हे लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण समारंभात सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या हस्ते पुणे महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेतील २ हजार ६५० सदनिका, विस्तारित मेट्रो मार्ग आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काही प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. मात्र अद्याप कार्यक्रमांचे स्थळ निश्चित झालेले नाही.
पंतप्रधानांची सुरक्षा, त्यांना मोटारीने प्रवास करताना लागणारा कालावधी आणि शहरातील वाहतूक याचा विचार करून ठिकाण ठरवले जात आहे. या काळात महापालिकेसह इतर संस्थांकडून लोहगाव विमानतळ रस्ता, येरवडा, नगर रस्ता, शिवाजीनगर, गणेशखिंड रस्ता, पेठा यासह इतर भागांत कोणत्याही स्वरूपाचे खोदकाम करू नये, असा आदेश आयुक्तांनी काढला आहे.
खोदकाम केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, अतिरिक्त आयुक्तांनी यासंदर्भात माहिती दिली.