Pimpri-Chinchwad : महापालिकेचा कारभार ‘खड्ड्यांत’; कामे अर्धवट, जीवघेणे खड्डे

Pothole
PotholeTendernama
Published on

पिंपरी (Pimpri) : विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे खोदकाम केले आहेत. पावसाळ्याचा दीड महिना संपली तरीही कामे सुरूच आहेत. काही ठिकाणी नव्याने खोदकाम केले जात आहेत. उन्हाळ्यात केलेल्या खोदकामाच्या ठिकाणी रस्ते बुजवून खडीकरण काही ठिकाणी डांबरीकरण केले होते. काही ठिकाणचे खड्डेही बुजले होते. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा खड्डे पडले असून, काम सुरू असलेल्या ठिकाणचे रस्ते चिखलमय झाले आहेत. वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी ते धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. ही स्थिती विशेषतः समाविष्ट गावांमध्ये अर्थात वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, चऱ्होली, मोशी, दिघी, भोसरी परिसरात गंभीर बनली आहे. खड्डे तातडीने बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे.

Pothole
Pune : 'त्या' टेंडरमध्ये पालिकेचे 40 कोटींचे नुकसान होणार? काय आहे कारण...

दिघी, आळंदी रस्त्यांची चाळण

भोसरीतील दिघी रस्ता आणि आळंदी रस्त्यावर जलवाहिन्या टाकल्या आहेत. मात्र, खोदलेले खड्डे व्यवस्थित भरले नाहीत. गेल्या आठवडाभर पडलेल्या पावसाने रस्त्यावरील खड्डे उघडे पडून रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दिघी रस्त्यावरील खड्डे कॉंक्रिटने भरले. पावसामुळे कॉंक्रिट उखडून जागोजागी खड्डे पडले आहेत. संविधान चौक ते मेडप्लस मेडिकलपर्यंत आणि गंगोत्री पार्क ते बन्सल सिटी रस्त्याची चाळण झाली आहे. भोसरीवरून दिघीला जोडणारा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते. गंगोत्री पार्कजवळील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) सीमा भिंतीजवळ पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे. दुचाकी चालकांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. आळंदी रस्त्यावर भोसरी-आळंदी चौक ते भाजी मंडईपर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. काही खड्डे अर्ध्या फुटापर्यंत खोल असल्याने वाहने खड्ड्यात अडकण्याचेही प्रकार घडत आहेत. हे खड्डे तातडीने बुजविण्याची आवश्यकता आहे.

Pothole
Pune APMC : पार्किंग टेंडरमध्ये मोठा घोटाळा; कोणी लावला 32 लाखांचा चुना?

साइडपट्ट्या न भरल्याने धोका

पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी पोलिस ठाणे ते लांडेवाडी प्रवेशद्वारापर्यंतच्या साइडपट्ट्या भरलेल्या नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्याकडेला अर्धा ते एक फुटापर्यंतचे खड्डे पडले आहेत. ऐतिहासिक प्रवेशद्वार आणि गुडविल चौकाजवळील वाहतूक नियंत्रक दिव्याजवळ काही दुचाकीचालक रस्त्याच्या खाली उतरून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, रस्त्याची साइडपट्टी न भरल्यामुळे मुख्य रस्त्यावर दुचाकी आणताना घसरून वाहन चालकांचा अपघात होत आहेत.

नागरिकांच्या समस्या वाढल्या

गंगोत्री पार्कमधील रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या गेल्या १०-१५ वर्षांपासूनची असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. गटाराचे चेंबर तुंबून बऱ्याचवेळा दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहण्याचा प्रकार येथे घडतो. तर रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या नित्याचीच झाली आहे. सध्या या रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात चिखल साचला असल्याने नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. याबाबत, ‘‘भोसरीतील दिघी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. येत्या चार दिवसांत हे खड्डे बुजविले जातील,’’ असे माजी नगरसेवक सागर गवळी यांनी सांगितले.

गंगोत्री पार्क रस्त्यावर ड्रेनेज लाइन, जलवाहिनी टाकल्या आहेत. पण, खोदलेले चर व्यवस्थित बुजवले नाहीत. त्यामुळे जलवाहिनी फुटू शकते. पक्क्या डांबरीकरणाची गरज आहे.

- प्रभाकर माने, गंगोत्री पार्क, भोसरी

पावसामुळे डांबरीकरण करणे शक्य होत नाही. पावसाने उघडीप दिल्यानंतर दिघी रस्त्यावरील गंगोत्री पार्क आणि अन्य रस्त्यांवरील खड्डे बुजवून डांबरीकरण करण्यात येईल.

- बालाजी पांचाळ, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com