Pimpri : अनेक अडथळे पार करत भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प लागला मार्गी

Water pipeline
Water pipelineTendernama
Published on

पिंपरी (Pimpri) : सरकारच्या विविध विभागांच्या परवानग्या, शेतकऱ्यांची हरकती, भूसंपादन प्रक्रिया, कोरोना काळ असे विविध अडथळे पार करत भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प मार्गी लागला आहे. जून २०२५ अखेरपर्यंत प्रकल्प कार्यान्वित करून, शहरात पाणी आणण्याचे उद्दिष्ट महापालिका प्रशासनाने ठेवले आहे.

Water pipeline
Mumbai: ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला मोठा बूस्टर

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांवर पोहोचली आहे. पवना धरणातून मिळणारे पाणी कमी पडू लागले आहे. पुरेशा दाबाने, नियमित व समन्याय पद्धतीने पाणी वितरणासाठी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला. तो आजपर्यंत कायम आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. शिवाय, आंद्रा धरणातून प्रतिदिन शंभर दशलक्ष लिटर पाणी मिळू लागले आहे. पुढील वर्षी जून अखेरपर्यंत भामा-आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लिटर पाणी आणण्याचे प्रशासनाचे नियोजन असून, त्यादृष्टीने काम सुरू आहे.

Water pipeline
Pune : नागरिकांच्या संतापाचा कडेलोट; गावेच काढली विक्रीला! काय आहे कारण?

भामा-आसखेडला उशीर का?

पिंपरी-चिंचवडसाठी आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातून अनुक्रमे १०० व १६७ असा २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) प्रतिदिन पाणी कोटा मंजूर आहे. त्यासाठी चिखलीत ३०० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात आहेत. १०० एमएलडी क्षमतेचे केंद्र गेल्या वर्षी कार्यान्वित केले आहे. त्याद्वारे आंद्रा धरणातील पाणी चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, दिघी, बोपखेल, भोसरी, मोशी-भोसरी प्राधिकरण भागात मिळू लागले आहे. मात्र, भामा-आसखेड प्रकल्पाचे काम विविध कारणांमुळे रखडले होते. यात वन विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा परिषद, अनेक ग्रामपंचायतींच्या परवानग्या आवश्यक होत्या. शेतकऱ्यांची हरकती होत्या. साधारण दोन वर्ष कोरोनामुळे काम बंद होते. काही प्रमाणात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव होता. आता काम मार्गी लागले आहे.

पुण्याला मिळाले, पिंपरीला नाही

- भामा-आसखेड धरणातील पाणी कोटा पुणे महापालिकेला २०११ मध्ये आणि पिंपरी-चिंचवडला २०१३ मध्ये मंजूर झाला

- सिंचन पुनःस्थापना खर्च माफीसाठी पुण्याने २०१३ पर्यंत पाठपुरावा केला, त्यांना यशही आले. २०१२ मध्ये त्यांना पाणीही मिळाले. पण, पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०१६ पर्यंत प्रयत्न करूनही खर्च माफ झाला नाही, त्यामुळे निविदा प्रक्रियाही राबवली नाही, आरक्षणही रद्द झाले

- पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये सत्तांतर झाले. रद्द झालेले आरक्षण पुन्हा मंजूर करावे लागले. सिंचन पुनःस्थापना खर्च भरावा लागला. अखेर २०१८ मध्ये प्रकल्पाचे काम सुरू झाले. त्यानंतर कोरोनाचे दोन वर्षे, शेतकऱ्यांच्या हरकती, सरकारच्या विविध विभागांचे परवाने मिळवावे लागले, जून २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

Water pipeline
Pune Airport: पुणे विमातळावरून प्रवास करणाऱ्यांसाठी खुश खबर! आता फक्त...

दृष्टिक्षेपात भामा-आसखेड प्रकल्प

- अशुद्ध जलउपसा केंद्र वाकीतर्फे वाडा येथे बांधण्याचे काम ६५ टक्के पूर्ण, त्यापासून तळेगावातील ब्रेक प्रेशर टँकपर्यंत ७.३० किलोमीटर १७०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी (रायझिंग मेन) टाकणार

- तळेगाव ब्रेक प्रेशर टँक बांधणी पूर्णत्वास असून, चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १४०० मिलिमीटर व्यासाची १८.८० किलोमीटरची ग्रॅव्हिटी मेन जलवाहिनी असेल, ८.४० किलोमीटर जलवाहिनी टाकली आहे

- तळेगावातील ब्रेक प्रेशर टँक बांधणीसाठी माती परीक्षणासह चिखली जलशुद्धीकरण केंद्राच्या जीए ड्रॉईंग, स्ट्रक्चरल डिझाईन ड्रॉईंगची कामेही पूर्णत्वाकडे

‘‘भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेमधील अशुद्ध जलउपसा केंद्राचे काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम जलद गतीने सुरू आहे. आंद्रा धरण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १०० दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र पहिल्या टप्प्यात बांधून कार्यान्वित झाले आहे. भामा-आसखेड योजनेतील अशुद्ध उपसा केंद्रातून १६७ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

- प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com