पुणे (Pune) : मेट्रोच्या (Pune Metro) प्रवाशांना आता तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही. कारण, हे तिकीट व्हॉट्सॲपवर (Whatsapp) उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी पुणे मेट्रोने सुरू केलेल्या ९४२०१०१९९० या क्रमांकावर व्हॉट्सॲप केल्यावर प्रवाशांच्या मोबाईलवरच क्यूआर कोड (QR Code) येईल आणि त्याच्या माध्यमातून मोबाईलवरच तिकीट मिळेल.
प्रवाशांना दोन पद्धतीने ई-तिकीट काढता येईल. पहिली पद्धत म्हणजे मेट्रोने प्रत्येक स्थानकात उपलब्ध करून दिलेल्या किऑस्क मशिनच्या साहाय्याने प्रवासी स्वतः हे तिकीट काढू शकतो. तर दुसरी पद्धत म्हणजे स्थानकात जाऊन टॉम ऑपरेटरशी संपर्क साधून आपल्याला हे ई-तिकीट मिळवता येईल. ही सुविधा मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध असेल.
किऑस्क मशिनने कसे काढाल तिकीट?
१. किऑस्क मशिनवर प्रवासाचा मार्ग निवडणे.
२. तिकिटाचे पैसे देताना कागदी तिकीट वा ई-तिकीट यापैकी हवा तो पर्याय निवडावा.
३. ई-तिकीट असा पर्याय निवडल्यावर आलेला स्कॅनर (QR कोड) आपल्या मोबाईलद्वारे स्कॅन करावा.
४. स्कॅन केल्यानंतर आपल्या व्हॉट्सॲपवर क्रमांकावर ओटीपी येईल.
५. हा ओटापी किऑस्क मशिनमध्ये टाइप करावा.
६. ओटापी मान्य झाल्यावर आपल्याला मोबाईलवर लिंक मिळेल.
७. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ई-तिकीट दिसेल.
ऑपरेटरशी संपर्क साधा
मेट्रो स्थानकावर गेल्यावर ऑपरेटरला कागदी तिकीट वा ई-तिकीट असे सांगितल्यावर काउंटरवर लावलेल्या स्कॅनरवर (QR कोड) मोबाईल स्कॅन करणे. स्कॅन झाल्यावर आपल्या व्हॉट्सॲपवर ओटीपी येईल. तो क्रमांक ऑपरेटरला सांगितल्यावर मोबाईलवर लिंक येईल. लिंक क्लिक करताच ई-तिकीट दिसेल.
नव्या तिकीट प्रणालीमुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे. याशिवाय ई-तिकीट पेपरलेस असल्याने हे पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे रांगेत थांबण्याची आवश्यकता भासणार नाही.
- डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो