पुणे (Pune) : प्रमुख सहा रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ (Pay & Park) सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिकेने (PMC) राज्य सरकारकडे जुलैमध्ये पाठविला. त्यास अद्यापही मान्यता मिळालेली नाही.
शहरात वाहनांची संख्या वाढत असून पार्किंगसाठी जागा मिळत नाही. अनेकदा जागा शोधत वाहनचालकांना इच्छितस्थळापासून लांब गाडी लावावी लागते. विशेषतः चारचाकी वाहनचालकांची मोठी अडचण होते. त्यामुळे महापालिकेने २०१८मध्ये प्रमुख रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यात पार्किंगसाठी झोन तयार केले.
कमी वर्दळीचा झोन ‘अ’, मध्यम वर्दळीचा ‘ब’ आणि भरपूर वर्दळ असलेल्या भागाचा ‘क’ झोन तयार केला. त्यानुसार प्रत्येक झोनचे प्रति तासाचे दर निश्चित केले. ‘अ’ झोनसाठी चारचाकीला १०, दुचाकीला दोन रुपये, ‘ब’साठी चारचाकीला १५, दुचाकीला तीन रुपये आणि ‘क’साठी चारचाकीला २० आणि दुचाकीला चार रुपये प्रतितास शुल्क घेतले जाणार आहे. हे धोरण तयार केल्यानंतर ‘पे अँड पार्क’ सुरू होइल, अशी अपेक्षा होती.
नगरविकास विभागाला पत्र :
‘पे अँड पार्क’ सुरू होत नसल्याने परिसर संस्थेने सरकारकडे तक्रार केली. त्यावर नगरविकास विभागाने महापालिकेला पत्र पाठवून विचारणा केली. या पत्राचा आधार घेत महापालिकेने १५ जुलैला राज्य नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये पार्किंग धोरणानुसार सरकारची मान्यता मिळावी, असे नमूद केले आहे.
समितीची बैठकच नाही :
‘पे अँड पार्क’करिता रस्ते निवडण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली पक्ष नेत्यांची समिती स्थापन केली, पण समितीने एकही बैठक घेतली नाही. प्रशासनाने वारंवार पत्रव्यवहार केला. त्यास पदाधिकाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्याने कोणत्या रस्त्यावर सशुल्क पार्किंग सेवा सुरू करायची याचा निर्णय झाला नाही. त्यानंतर २०१९ची विधानसभा निवडणूक, कोरोना अशी कारणे देत निर्णय घेण्याचे टाळले.
हे आहेत रस्ते...
१. जंगली महाराज रस्ता
२. नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता
३. नॉर्थ मेन रोड (गल्ली क्रमांक ५, ६, ७)
४. औंध डीपी रस्ता व संलग्न रस्ते
५. बालेवाडी हायस्ट्रीट
६. विमाननगर रस्ता