मुंबई (Mumbai) : RBIचे सुधारीत पतधोरण जाहीर करताना एक चांगली बातमीही गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे. आता तुम्ही तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड UPIशी सलग्न करता येणार आहे. क्रेडिट कार्ड यूपीआयशी जोडण्यात आल्यामुळे डिजिटल पेमेंटच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, त्याचा फायदा डिजिटल पेमेंटची सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांबरोबरच ग्राहकांनाही मिळणार आहे. ही सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, असे आरबीआयने म्हटले आहे.
तुम्हाला यूपीआयने पेमेंट करायचे असेल तर, बचत खाते (सेव्हिग अकाउंट) आणि चालू खाते (करंट अकाउंट) आदींबरोबरच तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्डही वापरता येणार आहे. या सुविधेमुळे क्रेडिट कार्डच्या माध्यामातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांची संख्याही वाढणार आहे. या सुविधेचा वापर करण्यासाठी तुम्हाला बचत खाते, चालू खाते आदींप्रमाणेच तुमचे क्रेडिट कार्ड यूपीआयशी जोडावे लागणार आहे.
रुपे क्रेडिट कार्डवर प्रथम सुविधा
डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणाच्या योजनेचा भाग म्हणून क्रेडिट कार्ड यूपीआयशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सुविधा पहिल्यांदा रुपेच्या क्रेडिट कार्डपासून सुरू करण्यात येणार आहे, असेही दास यांनी सांगितले. मास्टरकार्ड (MasterCard) आणि व्हिसा (Visa) क्रेडिट कार्डवर त्यानंतर ही सुविधा दिली जाणार आहे.