पुणे (Pune) : पुनर्विकासाच्या मुद्यावरून बालगंधर्व रंगमंदिर (Balgandharva Rangamandir) सध्या चर्चेत आहे. बालगंधर्वचा पुनर्विकास करायचा की नको, करायचा असले तर कसा करायचा, अशा कारणांवरून बरेच गटतट पडलेले दिसून येतात. त्यावरून जोरदार चर्चाही सुरू आहे. असे असले तरी बालगंधर्व रंगमंदिरात सध्या उपलब्ध सुविधा आणि त्यांचा दर्जा यांच्याबद्दल बोलताना कोणीही दिसत नाही. या ठिकाणी विविध कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होते, दुसरीकडे रंगमंदिरास महापालिकेकडूनच पुरेसे पाणी पुरविले जात नाही. कमी दाबाने होणाऱ्या पुरवठ्यामुळे दररोज सकाळी दोन व सायंकाळी दोन असे चार टँकर मागविण्याची नामुष्की ओढवली आहे.
बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे सुधारित आराखडा तयार केला जात आहे. मात्र, सध्या अस्तित्वात असलेल्या बालगंधर्वची स्वच्छता, मूलभूत सुविधांकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. अवघ्या दोन दिवसांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रम होणार आहे, त्यामुळे जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने बालगंधर्वच्या डागडुजीकडे लक्ष दिले आहे.
स्थापत्य व विद्युत विषयक कामे करण्यासाठी संबंधित विभागाकडून गडबड सुरू आहे. बंद पडलेला एसी दुरुस्त केला आहे. स्वच्छता गृह, चेंबर्सच्या देखभालीकडे लक्ष दिले आहे, असे असताना बालगंधर्व रंगमंदिरात पाण्याचा प्रश्न समोर आलेला आहे.
पाणीपुरवठा विभागाने बालगंधर्व रंगमंदिरासाठी स्वतंत्र नळजोड दिलेला आहे. याच जलवाहिनीवर मेट्रो आणि पोलिसांनी नळजोड घेतल्याने गेल्या चार-पाच महिन्यांपासून बालगंधर्वला कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे टाकी भरत नसल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे, असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
राष्ट्रपती दौऱ्यामुळे टाकी घेतली भरून
राष्ट्रपती कोविंद हे २७ मे रोजी बालगंधर्व रंगमंदिरात येणार आहेत. २६ मेपासून रंगमंदिराचा परिसर प्रतिबंधित केला जाणार आहे. यावेळी पाणी टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी बालगंधर्व प्रशासनाने टाकी भरून घेतली आहे.
बालगंधर्वला पाणीपुरवठा केली जाणारी जलवाहिनी जुनी झाल्याने तेथे कमी दाबाने पुरवठा होत आहे. भवन विभागाला ही जलवाहिनी बदलण्यास सांगितले आहे.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग
पाणीपुरवठा हा अत्यावश्यक बाब आहे, त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराच्या देखभाल दुरुस्तीसाठी असलेल्या तरतुदीतून हे काम केले जाईल.
- हर्षदा शिंदे, प्रमुख, भवन विभाग
बालगंधर्व रंगमंदिराला पाणी कमी येत असल्याने यापूर्वीच पाणीपुरवठा विभाग आणि भवन विभागाला कळविले आहे. पण अद्याप काम झालेले नाही. सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
- संतोष वारूळे, उपायुक्त, सांस्कृतिक विभाग