तळेगाव स्टेशन (Talegaon Station) : तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झालेच म्हणून समजा..! असा शब्द केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मावळचे आमदार सुनील शेळके आणि महामार्ग कृती समितीच्या शिष्टमंडळाला नुकताच नागपूर येथे दिला.
वारंवार होणारे जीवघेणे अपघात, रोजच्याच वाहतूक कोंडीसह गेली अनेक वर्षे कागदी फेऱ्यात अडकल्याने रखडलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती द्यावी, यासंदर्भात मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समितीचे उपाध्यक्ष दिलीप डोळस, सचिव अमित प्रभावळकर, सदस्य संजय चव्हाण आदींनी नागपूर येथील निवासस्थानी जाऊन गडकरी यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.
कृती समितीकडून दिलेल्या निवेदनात प्रस्तावित एनएच ५४८ - डी तळेगाव-चाकण-शिक्रापूर सहापदरी उन्नत महामार्गाच्या (एलिव्हेटेड कॉरिडॉर) भूसंपादनाची सनद प्रसिद्ध करून टेंडर प्रक्रिया पूर्ण करावी. हा महामार्ग एमएसआईडीसीकडे (राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ) वर्ग करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच प्रस्तावित उन्नत महामार्गाचे काम पूर्ण होण्यास लागणारा मोठा कालावधी पाहता तोपर्यंत तात्पुरती उपाययोजना आणि विशेष बाब म्हणून किमान अस्तित्वातील ५४ किलोमीटर रस्त्यावरील अतिक्रमणे काढून तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे, असे निवेदन कृती समितीकडून गडकरी यांना देण्यात आले.
त्यावर गडकरी यांनी सकारात्मकता दाखवत रस्त्याच्या कामाला प्राधान्याने गती देणार असल्याचे संकेत दिले. याबरोबरच जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील भुयारी मार्ग, उड्डाणपूल तसेच सेवा रस्त्यांच्या प्रलंबित कामांबाबत लवकरच ठोस निर्णय घेणार असल्याचे गडकरी यांनी आमदार शेळके यांना सांगितले.