पुणेकरांच्या सोईसाठी वाघोली ते शिरुरपर्यंतच्या उड्डाणपूलाची लांबी वाढणार 4 किमी

Nagar Road
Nagar RoadTendernama
Published on

पुणे (Pune) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) वाघोलीपासून शिरुरपर्यंत उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. पण, हा उड्डाणपूल पुणेकरांसाठी आणखी सोईचा व्हावा यासाठी याची लांबी आणखी सुमारे चार किलोमीटर वाढविण्यात येणार आहे. वाघोलीऐवजी रामवाडीपासूनच हा उड्डाणपूल सुरू होईल, त्याचा आराखडा ‘एनएचएआय’ने तयार केला आहे. तसेच, रामवाडीपासून लोहगाव विमानतळापर्यंत मेट्रोसाठी डीपीआर तयार करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Nagar Road
पुणे मेट्रोचे पाऊल पडतंय पुढे पण 'स्पीड'च घेईना; आता प्रवासी संख्या...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी नगर रस्त्याच्या वाहतूक कोंडी संदर्भात बैठक घेतली, त्यावेळी त्यांनीच ‘एनएचएआय’च्या निर्णयाची माहिती दिली. विधिमंडळ अधिवेशनात नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या प्रश्‍नावर वडगावचे आमदार सुनील टिंगरे यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावेळी मंत्री उदय सामंत या प्रश्‍नावर बैठक घेतली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी बैठक घेतली. उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार टिंगरे, आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, एनएचएआयचे वरिष्ठ अधिकारी अभिजित आवटे या वेळी उपस्थित होते.

Nagar Road
Pune : महापालिकेचा अजब कारभार; रस्त्याची जागा ताब्यात नसतानाही काढले 2 कोटींचे टेंडर

नगर रस्त्यावर ‘एनएचएआय’तर्फे शिरूर ते वाघोलीपर्यंत दुमजली उड्डाणपूल प्रस्तावित आहे. हा पूल वाघोलीपासून सुरू करण्याऐवजी विमाननगर- रामवाडीपासून सुरू करावा, अशी सूचना काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी दिली होती. त्यानुसार प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच महापालिकेतर्फे शास्त्रीनगर चौकातील कोंडी सोडविण्यासाठी येथे उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग केला जाईल. त्याची निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्याचीही पवार यांनी बैठकीत सूचना केली. नगर रस्त्यावर रामवाडीपर्यंत असलेला मेट्रो मार्ग थेट पुणे विमानतळापर्यंत जोडावा, असा आदेश पालकमंत्री पवार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिला.

Nagar Road
Pune Metro : स्वारगेट - कात्रज मेट्रोबाबत अजित पवारांनी दिली Good News

नगर रस्ता ‘सिग्नल फ्री’ करण्याचा प्रयत्न
आमदार टिंगरे म्हणाले, ‘‘नगर रस्ता सिग्नल फ्री करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यादृष्टीने ‘एनएचएआय’ने वाघोलीऐवजी रामवाडी मेट्रो स्थानकापासून हा पूल सुरू करण्यास मान्यता दिली आहे. उड्डाणपुलाची लांबी सुमारे चार किलोमीटर वाढल्याने नागरिकांना दिलासा मिळेल.’’

‘भूसंपादन लवकर पूर्ण करा’
शिवणे- खराडी रस्ता वडगाव शेरी मतदारसंघात रखडला आहे. हा रस्ता पूर्ण करण्यासाठी तातडीने भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करा. धानोरी, संतनगर, फाइव्ह नाईन चौक ते धानोरी, विश्रांतवाडी येथील पर्यायी रस्ते मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी जागेवर जाऊन पाहणी करावी अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com