पुणे (Pune) : वेगाने होत असलेले शहरीकरण (Urbanisation), कोरोनाच्या (Covi-19) संकटाचे कमी झालेले सावट आणि स्वतःच्या घराची निर्माण झालेली गरज आदींमुळे २०२१च्या तुलनेत २०२२ मध्ये घरांची चौकशी आणि खरेदी वाढली आहे. देशातील ६२ विकसकांनी हे मत नोंदवले आहे, तर ४३ टक्के विकसकांच्या मते निवासी बांधकाम क्षेत्रातील मागणी या वर्षी स्थिर राहील. मात्र, घरांच्या किमतींमध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
बांधकाम क्षेत्राबाबत देशातील विकसकांच्या काय भावना आहेत, हे समजून घेण्यासाठी ‘क्रेडाई’, ‘कॉलियर्स’, ‘लियासेस फोरस’ यांच्या संयुक्त विद्यमाने नोव्हेंबर ते डिसेंबर २०२२ दरम्यान एक सर्व्हे घेण्यात आला. यात ‘क्रेडाई’चे सदस्य असलेल्या देशातील १३ हजारहून अधिक बांधकाम व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला आहे.
त्यातील ३४१ विकसकांनी आपले मत नोंदवले. जवळपास ४३ टक्के विकसकांनी वाढत्या बांधकाम खर्चामुळे २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये प्रकल्पाच्या खर्चात १० ते २० टक्के वाढ झाल्याचे नमूद केले आहे.
देशातील बाजारपेठेत असलेली घरांसाठीची मागणी आणि बांधकाम साहित्याच्या किमतीतील अस्थिरता यामुळे घरांच्या किमतींत वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये प्रमुख बांधकाम साहित्याचा खर्च जवळपास ३२ टक्क्यांनी वाढला आहे. वाढत्या व्याजदरानंतरही गृहखरेदीदार घर खरेदी करण्यास उत्साही आहेत.
विकसकदेखील गृहखरेदीदारांच्या गरजेनुसार प्रकल्प सुरू करण्यावर भर देत आहेत. तसेच त्यांचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि मागणीनुसार पुरवठा करणारी धोरणे तयार करत आहेत, असे कॉलियर्सचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश नायर यांनी सांगितले.
विकसकांची मत - मतांची टक्केवारी
- मागणी वाढण्याची किंवा स्थिर राहण्याची अपेक्षा - ४३
- प्लॉटिंगची मागणी पर्यायी व्यवसाय मॉडेल म्हणून वाढेल - ३१
- २०२३ मध्ये घरांच्या किमती वाढण्याची अपेक्षा - ५८
- प्रकल्पाच्या खर्चात १० ते २० टक्के वाढीची नोंद केली - ४३
- यंदा घरांची मागणी २५ टक्क्यांनी वाढेल किंवा स्थिर राहील - ७०
- सरकारकडून व्यवसाय करणे सुलभ होण्याची अपेक्षा - ४०
- ब्रॅन्डेड घरांना पसंती दिली आहे - १९
- नवीन निवासी प्रकल्प सुरू करण्यास इच्छुक आहे - ८७
(सोर्स - कॉलियर्स, क्रेडाई, लियासेस फोरस)
२०२२ मध्ये गेल्या दशकातील विक्रमी विक्री झाली आहे. त्यामुळे ७० टक्क्यांपेक्षा जास्त विकसकांना विश्वास आहे की २०२३ मध्ये घरांची मागणी २५ टक्क्यांनी वाढेल किंवा स्थिर राहील. पुढील वर्षभर घरांच्या विद्यमान पुरवठ्याइतकीच नवीन प्रकल्पांच्या लॉन्चमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वाढती लोकसंख्या, संपत्तीची वाढ आणि जलद शहरीकरण हे या क्षेत्राच्या वाढीला चालना देणारे प्रमुख घटक आहे.
- हर्षवर्धन पतोडिया, अध्यक्ष, क्रेडाई नॅशनल