पुणे (Pune) : पिंपरी चिंचवड व पुणे शहराला जोडणाऱ्या जुनी सांगवी ते बोपोडीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील नवीन पुलाचे ९५ टक्के काम आता पूर्ण झाले आहे. येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये संबंधित पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही शहरांमधील नागरिकांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
रोजगार, नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त पिंपरी-चिंचवड व पुणे या दोन्ही शहरांमध्ये लाखो नागरिकांची दररोज ये-जा सुरू असते. आत्तापर्यंत या दोन्ही शहरांना चार ते पाच पुलांनी जोडले आहे. वाहने वाढल्याने सर्व पुलांवरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. वाहतूक कोंडीसारख्या प्रश्नांना सातत्याने सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेने २०२२मध्ये जुन्या सांगवीतील ममतानगर, दत्त आश्रम ते बोपोडीतील औंध रस्त्याला (जयकर पथ) जोडणारा पूल उभारण्यास सुरुवात केली.
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून या पुलाचे काम केले जात असून मार्च २०२३पर्यंत संबंधित पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, पुलाचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण न झाल्याने डिसेंबरपर्यंत मुदतवाढ घेण्यात आली होती. त्यानंतरही पुलाचे काम संथगतीने सुरू होते. आता पुलाचे ९५ टक्के काम झाले आहे. पुलावर कॉंक्रीट रस्ता तयार करण्यात येत आहे. याबरोबरच बॉटनिकल गार्डनच्या परिसरात दुभाजक, पदपथाची कामे सुरू आहेत. तसेच पिंपरी चिंचवडच्या हद्दीतील सेवा रस्त्यांची कामे सुरू आहेत. ऑगस्ट महिन्यापर्यंत सर्व कामे पूर्ण होण्याची शक्यता पुणे महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
असा सुटेल वाहतूक कोंडीचा प्रश्न
सध्या हिंजवडी, वाकड, पिंपळे गुरव, सांगवी येथून येणाऱ्या वाहनचालकांना पुण्यातील पुणे स्टेशन, येरवडा, लष्कर परिसरात जाण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, औंध रस्ता, सांगवी मार्गे पुढे जावे लागते. हा रस्ता पूर्ण झाल्यास संबंधित वाहनचालकांचा ताण वाचणार आहे. कोंडी कमी होईल. तसेच वेळ व इंधनाची बचत होणार आहे.
जुनी सांगवी ते बोपोडी पुलाचे ९५ टक्के काम झालेले आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत पुलाची सर्व कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नवीन पूल सुरू होऊ शकतो.
- अजय वायसे, कार्यकारी अभियंता, विशेष प्रकल्प विभाग.
- पुलाची लांबी - ७५० मीटर
- पूल बांधणीसाठी येणारा खर्च - ३५ कोटी २५ लाख
- पुणे महापालिकेने यंदाच्या अंदाजपत्रकात केलेली तरतूद - ६ कोटी