पुणे (Pune) : पुणे विमानतळाच्या (Pune Airport) नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले असून येथील प्रवासी सुविधांच्या चाचणीला सुरवात देखील झाली आहे. सप्टेंबरमध्ये या इमारतीचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. यामुळे विमानांच्या संख्येत आणि फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे. परिणामी प्रवाशांच्या संख्येतही वाढ होईल. (Pm Narendra Modi Pune News)
पुणे विमानतळावरील सध्याच्या टर्मिनल इमारतीची जागा कमी असल्याने प्रवासी सेवेच्या विस्ताराला मर्यादा आल्या होत्या. गर्दीच्या हंगामात प्रवाशांची होणारी गर्दी, त्याचा सुविधेवर पडणारा ताण, सेक्युरिटी चेकइनपासून ते विमानांच्या संख्येवर देखील याचा परिणाम होत असे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ही अडचण ओळखून पुणे विमानतळाचा विस्तार करण्याचे ठरविले. त्यासाठी नवीन टर्मिनल बांधण्याचे काम हाती घेतले. सुमारे ५२५ कोटीचा खर्च करून ही भव्य इमारत बांधण्यात आली. येथे प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळतील. त्याच सुविधांची सध्या चाचणी सुरू आहे. एक महिना ही चाचणी सुरू राहील. सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या टर्मिनलचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
या सुविधांची होतेय चाचणी...
- सरकता जिना
- लिफ्ट
- एरोब्रिज
- विविध डिस्प्ले
- इन लाईन बॅगेज स्क्रीनिंग सिस्टीम
- चेक इन काउंटर
- बॅगेज बेल्ट
कसे आहे नवे टर्मिनल?
क्षेत्रफळ : सुमारे ६० हजार चौरस फूट
प्रवासी क्षमता : वर्षाला एक कोटी २० लाख
एरोब्रिज : ५
एकूण खर्च : ५२५ कोटी
तीन पुलाच्या साहाय्याने टर्मिनल जोडणार
पुणे विमानतळावरील सध्याच्या टर्मिनलला नवीन टर्मिनल जोडला जाईल. यासाठी पूल बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. प्रवाशांना एका टर्मिनल मधून दुसऱ्या टर्मिनलमध्ये जाण्यासाठी तीन पुलाचा वापर करता येईल. त्यामुळे गर्दीचे विभाजन होईल. नवीन टर्मिनलमधून आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होईल. तसेच जुन्या टर्मिनलमध्ये प्रवाशांची गर्दी झाली तर आयत्या वेळेस नवीन टर्मिनल मधून देशांतर्गत विमानांचे देखील उड्डाण करण्याचे नियोजन विमानतळ प्रशासनाने केले आहे.
प्रवाशांना मिळणार या सुविधा
१. प्रवाशांची गर्दी नियंत्रणासाठी सेन्सरचा वापर.
२. प्रवाशांच्या बॅगेज चेक करण्याचा वेळ वाचावा म्हणून नव्या इन लाइव्ह बॅगेज प्रणालीचा वापर. यामुळे प्रवाशांना रांग लावावी लागणार नाही. तसेच या प्रणालीमुळे एक्स रे मशिनमधून बॅग बेल्टवर घेऊन जावे लागणार नाही. हे काम नवीन मशिन करेल. परिणामी प्रवाशांच्या वेळेत बचत होईल.
३. प्रवाशांना आराम करण्यासाठी लाउंज यात एक कमर्शिअल लाउंजचा देखील समावेश आहे.
४. कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी विमानतळावर स्काय लाईटचा वापर.
५. लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था.
६. रेस्टॉरंट.
नवीन टर्मिनल इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. प्रवासी सुविधेच्या चाचणीला सुरवात झाली आहे. सप्टेंबरमध्ये नवे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची आशा आहे. उद्घाटनाची तारीख अद्याप ठरलेली नाही.
- गगन मलिक, सरव्यवस्थापक, (नवे टर्मिनल ), पुणे विमानतळ