पुणे (Pune) : पुणे विमानतळावरील (Pune Airport) नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले असून ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान उद्घाटन होणार आहे. हवाई मंत्रालयाने तसे पत्र पुणे विमानतळ प्रशासनाला पाठविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याने तेच तारीख ठरविणार आहेत. त्या दृष्टीने तयारीही सुरू झाली आहे. त्यासाठी सोमवार (ता. २५) पासून काही अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे.
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचा विद्युत पुरवठा काही दिवसांपूर्वी सुरू झाला. तसेच विमान कंपन्यांच्या जुन्या इमारतीत असलेल्या कार्यालयाचे स्थलांतर नवीन इमारतीत करण्यास सुरुवात झाली आहे. सुविधांची चाचणीही यशस्वी झाली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून विमानतळाच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. येथे प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधाही मिळणार आहेत.
प्रवाशांना मिळणार या सुविधा...
- गर्दी नियंत्रणासाठी सेन्सरचा वापर
- प्रवाशांच्या बॅग तपासण्याचा वेळ वाचावा म्हणून ‘इन लाइव्ह’ बॅगेज प्रणालीचा वापर. त्यामुळे प्रवाशांना रांगेत उभे राहावे लागणार नाही
- प्रवाशांना ‘एक्स-रे’ मशीनमधून बॅग बेल्टवर घेऊन जावी लागणार नाही. यासाठी स्वयंचलित यंत्रणेचा वापर
- आराम करण्यासाठी कक्ष
- कार्बन फूट प्रिंट कमी करण्यासाठी स्काय लाईटचा वापर
- लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
- रेस्टॉरंट
नवीन टर्मिनलमुळे...
- विमानांची व प्रवाशांची संख्या वाढणार
- सध्याच्या टर्मिनलमधून ९० विमानांचे उड्डाण व लँडिंग
- दिवसभरात २० ते २२ हजार प्रवाशांची वाहतूक
- नवीन टर्मिनलवरून रोज १२० विमानांचे उड्डाण व लँडिंग होणार
- दिवसभरात ३२ ते ३३ हजार प्रवाशांची वाहतूक होणार
- विमानांची संख्या ३०नी तर प्रवाशांची संख्या १० हजारांनी वाढणार