पुणे (Pune) : नगर रस्त्यावरील वाघोली - लोहगाव (Wagholi - Lohegaon) येथून पिंपरी चिंचवडला जोडणाऱ्या ५.७ किलोमीटर लांबीच्या रिंगरोड (Ring Road) आणि सर्व्हिस रस्त्याचे काम महापालिकेकडून (PMC) करण्यात येणार आहे. त्यामुळे नगर रस्त्यावरून (Nagar Road) येरवडा मार्गे पिंपरी चिंचवड, मुंबईकडे (Mumbai) जाणारी वाहने शहरात न येता परस्पर जातील. परिणामी वडगाव शेरी परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी सांगितले.
पुणे महापालिकेच्या हद्दीलगतच्या भागातून रिंगरोड प्रस्तावित आहे. या रस्त्यासाठीचे सर्वेक्षण आणि भूसंपादनाचे काम प्रगतिपथावर आहे. ६५ मीटर रुंदीच्या या रस्त्याचा काही भाग वाघोली येथून लोहगावमार्गे पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये जातो. नगर रस्त्यावरील वडगाव शेरी, खराडी, येरवडा परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा रिंगरोड फायदेशीर ठरणार आहे.
महापालिकेने हा रस्ता करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार सल्लागाराकडून अहवाल तयार करून घेतला असून मंगळवारी झालेल्या एस्टिमेट कमिटीमध्ये त्यास मान्यताही देण्यात आली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्व्हीस रस्ते असतील. तसेच पावसाळी गटारे आणि विद्युत व्यवस्था करण्यात येणार आहे. काही ठिकाणी सिग्नल्सची व्यवस्थाही असेल. या कामासाठी २१२ कोटी रुपये खर्च असून पीपीपी तत्त्वावर क्रेडीट नोटच्या माध्यमातून हा रस्ता विकसित करण्यात येईल, असेही ते म्हणाले.