पुणे (Pune) : पुणे-मुंबई दरम्यान रेल्वेच्या (Mumbai - Pune Railway Line) तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने (MRVC) राज्य सरकारला सादर केला आहे. यासाठी पाच हजार १०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती ‘एमआरव्हीसी’चे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.
सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गिकांच्या बाजूनेच दोन नव्या मार्गिका टाकल्या जाणार आहेत. त्यासाठी रेल्वेची जमीन उपलब्ध आहे. मात्र, संरक्षण दलाची जागा काही प्रमाणात घ्यावी लागेल. राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर या प्रकल्पाचे काम कोणी करायचे, याबाबतचा निर्णय रेल्वे बोर्ड घेणार आहे.
पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्या व मालगाड्यांची संख्या जास्त आहे. तसेच लोणावळा ते कर्जत हा घाटाचा मार्ग असल्याने गाड्यांचा वेग कमी असतो. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होत आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा दरम्यान तिसरी व चौथी मार्गिका असणे आवश्यक आहे. यासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी ५० टक्के रक्कम राज्य सरकार देणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत जूनमध्ये बैठक झाली. त्यात मार्गिकांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यामुळे कामाला गती आली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ‘एमआरव्हीसी’ने १५ दिवसांत या प्रकल्पाचा सुधारित ‘डीपीआर’ सादर केला. मागील ‘डीपीआर’च्या तुलनेत खर्चात २०० कोटींची वाढ झाली. यात रेल्वेच्या जमिनीची किंमत गृहीत धरलेली नाही.
१७ स्थानकांची जोडणी अवघड
पुणे ते लोणावळा हे ६३ किलोमीटरचे अंतर आहे. यात एकूण १७ स्थानकांचा समावेश आहे. सध्याच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या शेजारीच दोन नव्या मार्गिका टाकण्याचा विचार आहे. मात्र, ‘त्या’ मार्गिकांना स्थानक जोडणे (कनेक्शन) हे अत्यंत अवघड काम आहे. तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट असलेल्या या कामांसाठी ‘यार्ड रिमॉडेलिंग’ करावे लागेल. यात सिग्नलचे खांब बदलावे लागतील. तसेच रुळांचेही काम केले जाणार आहे. तेव्हा हे काम रेल्वेशिवाय अन्य संस्थेने करायला देणे अवघड आहे. बालासोरच्या रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासन सिग्नल व ब्लॉकबाबतीत खूपच संवेदनशील झाले आहे.
मेल-एक्स्प्रेस धावणार
सध्याच्या मार्गिकांचा वापर लोकलसाठी करण्याचे नियोजन आहे. तिसरी व चौथी मार्गिका तयार होईल, तेव्हा त्यावरून मेल-एक्स्प्रेस, मालगाडी धावतील. या बाबतचा अंतिम निर्णय रेल्वेचा परिचालन विभाग घेईल. पुणे-लोणावळादरम्यान चार मार्गिका झाल्याने ताण हलका होईल. भविष्यात गाड्यांच्या संख्येत वाढ होईल.