Pune News पुणे : पुणे आणि हैदराबादमधील अंतर कमी करणाऱ्या हायस्पीड रेल कॅरिडोअर मार्गिकेच्या आराखड्यास (डीपीआर) केंद्र सरकारच्या रेल्वे बोर्डाकडून (रेल्वे मंत्रालय) अद्यापही ग्रीन सिग्नल मिळाला नाही. त्यामुळे हा प्रकल्प दोन वर्षांपासून कागदावरच राहिला आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून या प्रकल्पास मान्यता आणण्यासाठी पुण्यासह जिल्ह्यातील आमदारांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
भारतीय हायस्पीड रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडने देशात आठ ठिकाणी ‘बुलेट ट्रेन’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मुंबई-नागपूर आणि मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे अशा दोन प्रकल्पांचा त्यामध्ये समावेश आहेत. मुंबई ते हैदराबाद असे सुमारे ७११ किलोमीटरचे अंतर आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर हे अंतर साडेतीन तासांत पार करणे शक्य होणार आहे.
या रेल्वेचा मार्ग पीएमआरडीएच्या हद्दीतील लोणावळा, देहू व सासवड या हद्दीतून जातो. मात्र पीएमआरडीच्या विकास आराखड्यात हा मार्ग प्रस्तावित केला नव्हता. तो समाविष्ट करण्यासाठी हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनने पीएमआरडीएला पत्र दिले होते. त्याची दखल घेऊन पीएमआरडीएने प्रस्तावित विकास आराखड्यात हा मार्ग दर्शविला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या मार्गातील मोठी अडचण दूर झाली आहे. परंतु हाच मार्ग पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील फुरसुंगी आणि लोहगावच्या हद्दीतून देखील जातो.
फुरसुंगी येथे महापालिकेने दोन नगररचना योजना (टीपी स्कीम) प्रस्तावित केल्या असून दोन्ही योजनेचे प्रारूप महापालिकेने प्रसिद्ध केले आहे. त्यावर हरकती-सूचनांसाठी लवाद नेमण्यात आला आहे. ही दोन गावे वगळता उर्वरित गावांच्या विकास आराखड्याचे काम सुरू आहे. मात्र नगररचना योजना आणि प्रस्तावित विकास आराखड्यात महापालिकेने हा रेल्वे मार्ग दर्शविला नाही.
महापालिकेने त्यास मान्यता दिल्यानंतर सल्लागार कंपनीकडून या रेल्वे मार्गिकेच्या आराखड्याचे काम पूर्ण करून तो कार्पोरेशनकडे सादर करण्यात आला. कॉर्पोरेशनने छाननी केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी तो आराखडा रेल्वे बोर्डाकडे सादर केला. मात्र रेल्वे मंत्रालयाकडून त्यास मान्यता मिळाली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक नुकतीच झाली आहे. केंद्रात भाजपची तिसऱ्यांदा सत्ता आली. तर राज्यात गेल्या दोन वर्षांहून अधिककाळ महायुतीचे सरकार आहे. आता तरी हा प्रकल्प मार्गी लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रकल्पाच्या ठळक बाबी
१४ हजार कोटी रुपये - प्रकल्पाचा अंदाजे खर्च
२२० ते ३५० प्रतिकिलोमीटर - रेल्वेचा वेग
७५० - प्रवासी क्षमता
७११ किलोमीटर - मुंबई- हैदराबाद मार्गाची लांबी
साडेतीन तास - किती वेळात अंतर कापणार
इतर वैशिष्ट्ये....
- भारतीय हायस्पीड रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
- महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांतून ही रेल्वे जाणार
- या मार्गावर पुणे, सोलापूर, पंढरपूर असे मोजके थांबे असणार
- या रेल्वेसाठी स्वतंत्र लोहमार्ग टाकण्याचे नियोजन
- भूकंप झाल्यास आपोआप ब्रेकिंग सिस्टिम
- तातडीने भूकंप शोध आणि अलार्म सिस्टम (यूपीएडीएएस)
- काही मार्ग इलेव्हेटेड तर काही मार्ग भुयारी